
मुंबईच्या आरे कॉलनीतील मेट्रो रेल्वेच्या कार शेडला स्थगिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंगा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता थेट मोदींशी दोन हात करायला निघाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हाती आल्यानंतर उद्धव यांची आक्रमक भाषा पाहता ते मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेनला ब्रेक मारतील असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
जपानच्या मदतीने होणाऱ्या एक लाख कोटी रुपयाच्या ह्या प्रकल्पात महाराष्ट्रावर ५ हजार कोटी रुपयाचा बोजा आहे. मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या ३ तासात कापणारी ही अतिशय वेगवान आणि देशातली पहिली बुलेट ट्रेन आहे. बुलेट ट्रेनची घोषणा झाली तेव्हाच शिवसेनेने ह्या प्रकल्पाला विरोध केला होता. बुलेट ट्रेनची महाराष्ट्राला गरज नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे. उद्धव यांनी आता उघड विरोध केला नसला तरी ‘आढावा घेऊ’ असे म्हटले आहे. बुलेट ट्रेन मुंबईतून निघणार असल्याने मुंबईतच तिचे काम रोखून मोदींना जेरीला आणण्याचा उद्धव यांचा डाव आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचाही उद्धव आढावा घेणार आहेत. ४६ हजार कोटी रुपयांच्या ह्या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात होत्या तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी धावून गेली होती. समृद्धीसाठी जवळपास ९० टक्के जमिन सरकारच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे उद्धव आता काय भूमिका घेणार ह्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे सरकार म्हणून उद्धव सत्तेवर आले असले तरी ते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा शकतील अशी सरकारच्या खजिन्याची परिस्थिती नाही. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या कृपेने मिळालेल्या सत्तेचा वापर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन हात करून देशाचे नेते होण्याची उद्धव यांची धडपड आहे. शेतकरी, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे पैश्याची मागणी मागेच केली आहे. पैसे मिळालेही असते. पण भाजपचे सरकार गेल्याने मोदी मदत देताना हात आखडता घेतील. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव आणि केंद्र सरकार यांच्यात वारंवार खटके उडाल्याचे दिसणार आहे.