उद्धव ठाकरे आज दिल्लीत मोदी, सोनियांना भेटणार

Narendra-Modi-Uddhav-Thackeray

नवी दिल्ली :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

नरेंद्र मोदी आणि उद्धव यांची भेट संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी होईल. ६ वाजता ठाकरे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटतील. ७.३० वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट उद्धव ठाकरे घेतील.

ठाकरे सरकारला मोठा धक्का ; ही’ शिफारस राज्यपालांनी केली अमान्य

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानीत जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची अवघ्या काही मिनिटांची ओझरती भेट झाली होती.

ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिला राजकीय रंग न देण्याचं आवाहन ट्विटरवरुन केले होते. परंतु शिवसेना-भाजपा युतीमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच अधिकृत चर्चा होणार आहे.

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

सात मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौर्‍यात ते रामलल्लांचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर आरती करतील. अयोध्येत राम मंदिराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारनेही ट्रस्टची स्थापना करून मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्याविषयी उद्धव ठाकरे आणि मोदींची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

सीएए-एनआरसी आणि एनपीआर

महाराष्ट्रात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबतही तणावाचं वातावरण आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उघडपणे सीएए, एनआरसी आणि एनपीआरला विरोध करत आहेत, तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात एनपीआर अंतर्गत जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचे मत वैयक्तिक असल्याचं सांगितलं. आमचा पक्ष सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या पूर्णपणे विरोधात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.