पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant patil-Uddhav Thackeray-Yoshomati Thakur

मुंबई :- पोलिसाला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या मंत्री योशोमती ठाकूर (Yoshomati Thakur) यांना अजून मंत्रिमंडळातून न काढल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचावर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) म्हणाले – “आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात.”

न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी स्वतः ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण अजूनही त्या पदाला चिकटून आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हकलावे; पण मुख्यमंत्री याबाबत काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, “वरिष्ठ न्यायालयात मला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर म्हणतात. तरीही त्यांनी निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.

प्रकरण

एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावती न्यायालयाने तीन  महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक  महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. या प्रकरणी शहर वाहतूक शाखेतील उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा मार्ग एकेरी असल्याचे सांगून त्यांनी वाहन रोखले. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनातून खाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER