राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचे ‘शिवसंपर्क’ अभियान; ठाकरे सरकारला मध्यवधीची धास्ती?

मुंबई : राज्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवादयात्रा’ काढल्यानंतर आता शिवसेनाही (Shivsena) राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी माध्यमांना दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात शिवसेनेचे ‘शिवसंपर्क’ अभियान (Shivsampark campaign) राबवले जाणार आहे.

मंगळवारी शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत शिवसंपर्क अभियानाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवादयात्रा काढली होती. तर आता शिवसेनेकडूनही शिवसंपर्क अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील दोन घटकपक्ष संपर्कयात्रा काढत असल्याने सत्ताधाऱ्यांना मध्यावधी निवडणुकांची धास्ती वाटू लागली आहे का? असा सवाल सर्व स्तरावरून उपस्थित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेची ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बैठक होती, हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER