‘एक उमदा सहकारी गमावला’ – उद्धव ठाकरेंची सुरेश गोरेंना श्रद्धांजली

Suresh Gore-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : शिवसेनेचे खेड-आळंदी विधानसभेचे माजी व प्रथम आमदार सुरेश गोरे (Suresh Gore) यांचे आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कोरोनाची (Corona virus) लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुरेश गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनामुळे शांत, संयमी पण सामान्यांच्या प्रश्नांसाठी कणखर भूमिका घेणारा एक उमदा सहकारी गमावला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आळंदी-खेडमधील अनेक लोकाभिमुख कामांसाठी त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिले, असाही त्यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

सुरेश गोरे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या लढाईत त्यांना अपयश आले. शांत, मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्यांनी राजकारण व समाजकारणात वेगळा ठसा उमटवला होता. तालुक्यात सुरेश गोरे यांनी ‘भाऊ’ या नावाने ओळख निर्माण केली होती.

ते माजी खासदार शिवाजी आढळराव, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात चाकणला सुरेश गोरे यांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरे दोन वेळा आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या गोरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी ३० हजारांवर मतांनी गोरे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर मात केली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली.

विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्याला धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER