उद्धव ठाकरेंची यशवंत सिन्हा यांच्यासोबत फोनवर चर्चा

अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकाविरोधात अकोल्यात आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला.शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे .

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करु, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या यशवंत सिन्हा यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी पाठिंब्यासाठी थेट अकोल्यात येणार आहेत. खासदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.

अकोल्यात आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणं पसंत केलं. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत.