उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला?

Uddhav Thackeray

badgeमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात टाळ्या वाजवाव्या असाच आजचा दिवस होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले नसले तरी पुढचे सरकार युतीचेच राहील, असे सांगून त्यांनी युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आज मूडमध्ये होते.‘यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री’ ह्या शब्दात मोदींनी फडणवीस यांचा गौरव केला. मोदींनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘लहान भाऊ’ असा केला. ह्या लहान भावाने मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला, युतीमध्ये सारे आलबेल आहे असे विश्लेषण मोदींच्या आजच्या मुंबई भेटीचे करता येईल.

ही बातमी पण वाचा : युतीचा फॉर्म्युला बनला सस्पेन्स

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे टेन्शन आज दूर झाले. पण तेवढेच प्रश्नही निर्माण झाले आहेत. जागावाटपावरून भाजप-शिवसेनेत मतभेद झाल्याच्या चर्चा ह्या आठवड्यात रंगत होत्या. विधानसभा निवडणुकीत जागावाटप निम्मे-निम्मे होईल असा करार ह्या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला होता. गेल्या चार महिन्यात खूप हवा बदलली आहे. ३७० कलम रद्द झाल्यामुळे भाजपचा जनादेश वाढला आहे. त्यामुळे आता फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला भाजपला मंजूर नाही. पण उद्धव निम्म्या जागांसाठी आग्रही आहेत. शिवसेनेला निम्म्या जागा दिल्या तर भाजपला वावच उरत नाही. भाजपचे १२२ विद्यमान आमदार आहेत. शिवाय मित्रपक्ष आणि अनेक आमदार, नेते पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. १३५ जागांच्या कोट्यात ह्या सर्वांना कसे बसवणार? शक्यच नाही. दोन्ही बाजूने ताणून धरल्याने युती तुटते की काय असे वातावरण तयार होऊ लागले होते. पण आज उद्धव यांनी केलेली मोदी यांची प्रशंसा पाहिली तर उद्धव फार ताणणार नाहीत असे दिसते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलेला दिसतो. ‘लहान भाऊ’ म्हटलं तर तेवढा त्याग करावा लागतो. उद्धव हे सारे उघड बोलले नाहीत. जागावाटपाचा विषयही त्यांनी काढला नाही. अर्थात अशा गोष्टी जाहीरपणे बोलायच्या नसतात. निवडणुकीला अजून सव्वा महिना आहे. गणपती उठल्यानंतर हे विषय मार्गी लागतील. पण शिवसेना आता फार आक्रमक नसेल. शिवसेनेला शंभराच्या आसपास जागा देऊन जागावाटपाचा विषय गुंडाळला जाईल. फडणवीस आणि उद्धव यांच्यात छान ट्युनिंग आहे. त्याचा फायदा यावेळी होईल. शिवसेना गेल्या निवडणुकीत स्वबळावर लढून पाहिले. फक्त ६३ जागा मिळाल्या. शिवसेनेची तेवढीच ताकद आहे. त्यामुळे तिने नमते घेण्यात युतीचे भले आहे. निकालानंतर सरकारमध्ये एकत्र यायचेच असेल तर मग उगाच खळखळ कशाला करायची? काँग्रेस आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्यात फूट पडल्याने यावेळच्या लढती तिरंगी होणार आहेत. निकाल स्पष्ट असला तरी लढती रोमांचक असतील.

ही बातमी पण वाचा : वंचितकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात हा तगडा उमेदवार लढणार?