‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाही’, नारायण राणेंचा घणाघात

CM Uddhav Thackeray - Narayan Rane

मुंबई :- ‘ठाकरे’ सरकार (Thackeray Goovt) महाराष्ट्राच्या जनतेचे शोषण करणारे सरकार असून करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, सध्याचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेचे शोषण करणारे आहे. त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यासह उघडकीस आणणार आहो. मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लायकीचे नाहीत. या सरकारने करोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही मोठा भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर का रद्द केलं? राऊतांनी याच आधी उत्तर द्यावं. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर टीका करताना दिसतात. मग या राज्य सरकारने थेट केंद्रातच विलीन व्हावे. राज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल ते म्हणतात, करोनाला हद्दपार करण्यास आम्ही समर्थ नाही. उलट करोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे. त्यांना यानिमित्ताने पैसे लाटायला मिळाले. सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाही…ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत..काहीच नाही. जनाची नाही तर मनाचीही लाज नसलेलं हे सरकार असून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे लायकीचे नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

सामनाच्या अग्रलेखावरुन त्यांनी संजय राऊतांनाही खडे बोल सुनावले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचं आणि कुणाला गणपती करायचं हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, असं सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करतानाच राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केलं. मागच्या वेळी सिंधुदुर्गाला २५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिंधुदुर्गाला ५० लाख रुपयेच मिळाले. आता पुन्हा मुख्यमंत्री कोकणात आले. लोकांनाही भेटले नाही. काही तासांत मातोश्रीवर आले. नुसता पिकनिक दौरा होता. दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले. अजून मदत जाहीर केली नाही. कोकणाला २०० कोटींचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत. त्यांच्या कोकण (Konkan) दौऱ्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरोघरी जावं लागतं. पंचनामे करावे लागतात, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री ज्या विमानतळावर उतरले ते विमानतळ आधी सुरू करा. ज्या विमानतळाला परवानगी नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उतरतातच कसे?, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री चिवला बीचवर आले होते. तिथे माझं घर आहे. राणेंचं घर कसं दिसतं हे बघायला आले असतील. ते चिवला बीचवर येणार आहेत हे माहीत असतं तर मी थांबलो असतो. त्यांना घरी बोलावून नारळपाणी दिलं असतं, असा चिमटाही त्यांनी काढला.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहे. ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button