पक्के होत चालले उद्धव सरकार

badgeशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन काँग्रेसच्या मदतीने महाविकासआघाडीचे सरकार बनवले तेव्हा भाजप नेत्यांनी ते फार टिकणार नाही असे म्हटले. भिन्न विचारधारेचे हे सरकार सहा महिन्यात पडेल असे भाकीत अनेकांनी केले. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाराजी उफाळून आली तेव्हा तर विरोधी तंबूत आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. सत्तास्थापनेला आता तीन महिने होत आहेत. अस्थिरता, नाराजी तर दूर, उद्धव यांचे आसन अधिकाधिक भक्कम होताना दिसत आहे. शिवाजी महाराज, ‘जाणता राजा’ ह्यावरून राज्यात कलगीतुरा सुरु असताना सरकारवरील आपली मांड उद्धव अधिक मजबूत करताना दिसत आहेत.

मंत्री नीट वागले नाहीत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची भीती ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नुकतीच बोलून दाखवली. पण वादळांमुळे राजीनामा देऊन पळण्याएवढे उद्धव लेचेपेचे नाहीत. ते राजीनामा देणाऱ्यांपैकी नाहीत. उलट ते काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊ शकतात. अजित पवार, सुनिल केदार ह्या मंत्र्यांवर घोटाळ्यांची टांगती तलवार आहे. उद्या कोर्टाने उलटेसुलटे ताशेरे मारले तर ह्या मंत्र्यांचे काही खरे नाही.

अवघ्या तीन महिन्यात उद्धव यांनी स्वतःची सर्वसमावेशक प्रतिमा निर्माण केली आहे. हे सोपे नव्हते. नागरिकत्वाचा मुद्दा, सावरकर, हिंदुत्व, जेएनयूमधील हल्ला अशा विषयांवर उद्धव यांचे वक्तव्य काँग्रेसवाल्यांपेक्षा अधिक कडक होते. २५ वर्षांपासून शिवसेना भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आली. पण आक्रमक हिंदुत्व एकहाती सत्ता देऊ शकत नाही हे हेरून उद्धव यांनी वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. मवाळ हिंदुत्व स्वीकारल्याने सर्वसमावेशक विचाराची मोठी व्होट बँक शिवसेनेला खुली झाली आहे. आतापर्यंत दोन्ही काँग्रेस ह्या व्होट बँकेवर डल्ला मारत आल्या. उद्धव ‘सेक्युलर’ झाल्यामुळे भविष्यात दोन्ही काँग्रेसची खरी स्पर्धा शिवसेनेशी राहणार आहे.

ही लाईन पकडून ममतादीदी, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव आदी नेते एकहाती सत्तेत आले. उद्धव यांनी तीच रणनीती स्वीकारली आहे. उद्धव यांना सहज गुंडाळू अशा भ्रमात दोन्ही काँग्रेसवाले असतील तर ते चुकत आहेत. उद्धव दिसतात तसे नाहीत. पोचलेले आहेत. शरद पवारांच्या एका डावाने देवेंद्र फडणवीस यांना आस्मान दाखवले. तोळामासा तब्येत मिळालेले उद्धव हे भाजपसाठी तेल लावलेले पहेलवान ठरत आहेत. त्यांच्या सुदैवाने वातावरण बदलले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेकारी हे विषय मागे पडले आहेत. जनतेला स्वतःचे नागरिकत्व वाचवण्याची चिंता लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांचे टार्गेट झाले आहेत.