पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात; उद्धव ठाकरेंचा टोमणा

Sharad-Pawar-And-Uddhav-Thackeray-1

उस्मानाबाद :- सत्ता आली तर महाराष्ट्रात १० रुपयांमध्ये जेवण देण्याची घोषणा शिवसेनेने केली. शरद पवारांनी या वरून शिवसेनेवर केलेल्या टीकेबाबत उद्धव ठाकरे यांनी – शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची उपाशी आहेत. अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, असा टोमणा पवारांना मारला.

ही बातमी पण वाचा : मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे

शरद पवारांचा समाचार घेताना ठाकरे पुढे म्हणाले – दुष्काळी भागासाठी काय केलं? चारा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. यापूर्वी पवारांनी हे का नाही केलं?

बाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं अजित पवार म्हणतात मग माफी का मागत नाही? असा प्रश्नही उद्धवने विचारला.

भाजपाला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार पडलं असतं. सरकार हलतं डुलतं झालं असतं. आमच्यामुळे हे सरकार तरलं. मी सत्तेत असूनही बोलतो. या सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचाही वाटा आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. दुष्काळाचं चक्र भेदण्यासाठी वॉटर ग्रीड आणणार असल्याचं आश्वासन दिलं.

ही बातमी पण वाचा : हे पार्सल कुठेही पाठवा, मुंबईत पाठवू नका : उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका 

उस्मानाबादच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतल्या नाराजांना व्यासपीठावर बोलावलं आणि वितुष्ट संपवण्याचा प्रयत्न केला. बंडखोराला थारा देणार नाही, तसंच पाठीत खंजीर खुपसला तर सोडणार नाही, असा इशारा दिला.

मला सत्ता पाहिजे, पण ती खुर्च्या उबवण्यासाठी नाही, तर राबवण्यासाठी पाहिजे. आताचं राजकारण विचित्र झालं आहे. कोणावर टीका करायची? आज एखाद्या उमेदवारावर सडकून टीका केली तर नंतर तो आमच्याच पक्षात दिसतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.