तुझा धर्म बघून तुला निवडून दिले नाही; उद्धव ठाकरे जलील यांच्यावर बरसले

Uddhav Thackeray-Imtiyaz Jaleel

मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमाला तेथील खासदार उपस्थित झाले नाहीत. त्यांचा धर्म बघून त्यांना निवडून दिलं का? धर्मावरून आम्ही स्वीकारू. मात्र, औरंगजेबाच्या, निजामाच्या विचारसरणीचा खासदार म्हणून कार्यक्रमाला आले नसेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर येथे विक्रम संपत यांच्या ‘सावरकर : इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ठाकरे बोलत होते.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे गैरहजर होते. आणि त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला. देशाच्या लोकसभेत असा खासदार कसा निवडून येतो? अशा कठोर शब्दात टीका केली. मी राहुल गांधींना नालायक बोललो. राहुल गांधी हे बेअक्कल आहेत. त्यामुळे आता ते पंतप्रधान होऊच शकत नाहीत. हे सावरकरांवर लिहिलेले पुस्तक बेअक्कल राहुल गांधीला वाचायला द्या. सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार डॉ. भारतकुमार राऊत आणि सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर आणि ‘सावरकर : इकोज फ्रॉम ए फॉरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे लेखक विक्रम संपत उपस्थित होते.