देशातील हिंदूंना न्याय देऊ शकत नसू, तर कशाला पुळका बाहेरच्या हिंदूंचा? – मुख्यमंत्री ठाकरे

नागपुर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथ्या दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ‘तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मी बोलणार आहे’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्दयाला हात घातला. ‘सावरकरांनी जरुर सांगितलं होतं की हिंदू असेल, तर त्याला दोन घास द्या. बाहेरील देशातील हिंदू घ्या, जरुर घ्या. पण त्यांना ठेवणार कुठे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्तित करून भाजपचे सावरकर आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून कान टोचले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचीदेखील आठवण करून दिली. ते म्हणाले, ज्यावेळी काश्मीरमधील ब्राम्हण आपल्याकडे निर्वासित म्हणून आले होते, त्यावेळी केवळ शिवसेनाप्रमुखांनी त्यांना आसरा दिला होता. ‘बाहेरील देशातील हिंदूच्या येण्याबद्दल आमची ना नाही, पण त्यांची काळजी घेणार कोण? हा माझा प्रश्न आहे. फडणवीसांनी जे सावरकरांचं वक्तव्य आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. मग बेळगावचे बांधव हिंदू नाहीत का? ते मराठी आहेत. त्यांच्यावर भाषिक अत्याचार होतात. मग आपण त्यांच्यासाठी केंद्रात जाऊन मदत मागू शकत नाही का? सावरकरांना मानत असू, तर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा नाही का? कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आपल्याकडे आणला पाहिजे.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, नागरिकत्व सुधारणा विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘देशातील हिंदूंना न्याय देऊ शकत नसू, तर कशाला पुळका बाहेरच्या हिंदूंचा? घ्या जरुर घ्या. पण जर भूमिपुत्रांना न्याय देत नसू, तर काय उपयोग? म्हणून मी सावरकरांची आठवण याचसाठी करुन दिली. अखंड हिंदुस्थान, सिंधू नदी ते सिंधू सागरापर्यंत सावरकरांच्या स्वप्नातील हिंदुस्थान आम्हाला हवा आहे, तुम्हाला हवा की नाही हा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा सावरकर म्हणजे काय? हे दुसऱ्यांना समजून सांगण्याआधी स्वतः समजून घ्या’ असा विरोधकांना टोला लावत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण केले.