केवळ मतांसाठी उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा – अशोक चव्हाण

Chavan-Uddhav

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांना लक्ष करत अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत येत्या २५ तारखेला अयोध्येतजाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला कुठलाही अर्थ नाही. हा दौरा केवळ मतं मिळवण्यासाठी केला जातो आहे. पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. अशात आपल्या पक्षाचं महत्त्व वाढवून घ्यायचं आणि मग याच मुद्द्यावर मतं मागायची हा या मागचा मूळ उद्देश आहे असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी अयोध्येतील विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे. तिथे त्यांचे स्वागत होईल. त्या दिवशी त्यांचे दोन कार्यक्रम होतील.

दुपारी ३ वाजता लक्ष्मण किल्ला या भागात महाराजींच्या आशीर्वादाने तिथे आशीर्वाद समारोह होईल, संत पूजन होईल. त्याचे मुख्य यजमान हे उद्धव ठाकरे असतील. त्या कार्यक्रमाचे आयोजन हे राजकीय नसेल. त्याचे आयोजन हे अयोध्यावासींनी केले आहे. तिथे सर्व संतांचे पूजन व्हावे अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही. तिथे सर्व साधू-संत, अयोध्येतील जनता, मंदिरांचे प्रमुख, मंदिरांचे पुजारी, हिंदू धर्मिय संस्थांचे लोक असे सगळे उपस्थित असतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना सर्व संतांचे आशीर्वाद मिळावे अशी इच्छा आहे. त्यामुळे सर्वांना आमंत्रण दिले आहे, जवळपास सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला.