‘एनपीआर’ छाननीसाठी आघाडीच्या मंत्र्यांची समिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray - NPR

मुंबई : येत्या १ एप्रिलपासून लोकसंख्या सूची (एनपीआर) प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राज्यात एनपीआर लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नेत्यांची नाराजी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रीय एनपीआर प्रक्रियेच्या छाननीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांची समिती नेमण्याची घोषणा केली. एकीकडे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूचीबाबत शिवसेनेने अनुकूल भूमिका घेतल्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरू झाली होती.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी

काँग्रेस-राष्ट्रवादीने सीएए आणि एनपीआरविरोधात भूमिका घेतली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गोष्टींना एकप्रकारे पाठिंबा दिला होता. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मध्यस्थी करून शनिवारी एकत्रित बैठक घ्यावी लागली. तर काँग्रेसने आपली नाराजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सावध पवित्रा घेतला.

राष्ट्रीय लोकसंख्या सूचीबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांची नेमली जाईल. त्यात काही अडचण नसली तरी ती सूची तयार करण्याच्या प्रक्रियेत काही अडचणीचे-अनावश्यक प्रश्न तर नाहीत ना हे पाहण्याचे काम ही समिती करेल. काही अडचणीचे असेल तर ते सर्वासमोर आले पाहिजे. लोकांना जगण्याचा अधिकार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.