राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी दूर होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री गडकरी यांची बैठक

Nitin Gadkari - Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे ६ हजार ६०७ कि.मी.चे १५९ प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी ४ हजार ८७५ कि.मी. रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. भूसंपादन व वन विभागाच्या अडचणीमुळे ६८० कि.मी. रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सध्या राज्यात १४ हजार ४०९ कि.मी. लांबीची १ लाख ४०९ कोटींची कामे सुरू आहेत. आणखी ५ हजार ५०० कोटी रुपयांची कामे मंजूर केली, असे गडकरी यांनी सांगितले. पंढरपूर-देहु आणि देह-आळंदी या पालखी मार्गाचे कामही पूर्णत्वास नेण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. पुणे चांदणी सुरत – नाशिक अहमदनगर – सोलापूर – हैदराबाद – चेन्नई असा मार्ग करत आहोत. यामुळे उत्तर दक्षिण वाहतूक वेगवान होईल. नागपूर (Nagpur) – हैदराबाद महामार्गही बांधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच एक वर्षाच्या आत मुंबई – गोवा मार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोन बडे नेते शिवबंधन बांधणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER