बॉलिवूड कनेक्शनने उद्धव सरकार अडचणीत

badgeमुलाच्या बॉलिवूड कनेक्शनमुळे (Bollywood Connection) १० वर्षांपूर्वी विलासराव देशमुखांवर (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्रिपद गमावण्याची पाळी आली होती. त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aaghadi Govt) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढे आज उभे ठाकले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) याच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण नाजूक वळणावर निघाले आहे. तातडीने काही होणार नाही. पण सुशांत प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य (Aaditya) यांना पाचारण केले तर आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते.

चौकशीत धक्कादायक बाबी समोर येत असल्याने काहीही घडू शकते. आज तर सुशांतच्या एका सिनेमाच्या जनसंपर्काचे काम पाहणाऱ्या कंपनीतील दिशासालीयान नावाच्या तरुणीच्या आत्महत्येचीही चौकशी सीबीआयने सुरू केल्याने गूढ वाढले आहे. सुशांत हा मूळचा बिहारचा. मुंबईशी त्याचा संबंध बॉलिवूडपुरता. पण बिहारमध्ये (Bihar) महिनाभराने निवडणुका आहेत. त्यामुळे ह्या प्रकरणाला कमालीचे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री नीतीशकुमार यांचा धूर्तपणे राजकीय फायदा उठवत आहेत. सुशांत त्यांना पुन्हा सत्तेत बसवतो की काय, ते दिसेल. पण सुशांतसिंह चौकशीचे भूत शिवसेना आणि आघाडी सरकारच्या मानगुटीवर बसले आहे.

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या ह्या घटनेची आत्महत्येपलीकडे चौकशी करायला मुंबईचे पोलीस (Mumbai Police) उत्सुक नव्हते. बिहार पोलिसांनी हा राजकीय इश्यू केल्याने सीबीआयने एन्ट्री (CBI Entry) घेतली. मोदी सरकारने सीबीआय चौकशी लावल्याने शिवसेना आणि त्यांचे सरकार धास्तावले आहे. भाजपचा (BJP) कुणी बडा नेता थेट नाव घेत नसला तरी आदित्य यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी खुलासा केला असला तरी ती थांबायला तयार नाही. आदित्य यांची बॉलिवूडमधील अनेक बड्या कलावंतांशी मैत्री आहे. रात्रीच्या अनेक बॉलिवूड पार्टीत आदित्य जातात असे बोलले जाते. सुशांतच्या प्रकरणात बॉलिवूड, ड्रग, घराणेशाही असे वेगवेगळे कंगोरे बाहेर येत असल्याने राजकारण तापले आहे. सुरुवातीलाच मामला सीबीआयकडे दिला असता तर उद्धव यांना कुरघोडी करता आली असती.

सीबीआयला का तयार नव्हते? हा अभ्यासाचा विषय झाला. पण त्या गडबडीमुळे संपूर्ण सरकारला बचावात्मक खेळावे लागत आहे. उद्धव यांनी मुलाला मंत्रिमंडळात घ्यायला नको होते. पुत्रमोहाची जबर किंमत त्यांन द्यावी लागत आहे. आदित्य यांचा काही संबंध नसेलही. पण त्यांच्या आडून उद्धव यांना टार्गेट करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. भाजपला दगा देऊन उद्धव दोन्ही कॉंग्रेससोबत (Congress) सरकारमध्ये बसले.

भाजपला याचा हिशेब चुकता करायचा आहे. सुशांतचे प्रकरण सुरुवातीला आत्महत्या वाटत होते. पुढे बॉलिवूडमधील घराणेशाहीचा तो बळी असल्याचे चित्र येऊ लागले. आता तर ड्रग टोळीची चर्चा सुरू आहे. तरुण पिढी ज्यांना डोक्यावर घेते ते नट -नट्या किती घाणेरडे असतात याचे किस्से रंगू लागले. कंगना राणावत ह्या नटीने तर रणबीर, रणवीर ह्या हिरोंनी स्वतःहून ड्रग चाचणी करून घ्यावी, असे आव्हान दिले आहे. हा धागा पकडून माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य यांना टार्गेट केले. रणबीरच काय, आदित्य यांनीही ड्रग टेस्ट करून घ्यावी, असे निलेश म्हणतात. हा शिमगा २०२४ च्या निवडणुकीपर्यंत चालेल. तोपर्यंत सरकार टिकेल? कठीण आहे. उद्धव यांचा राजकीय कस लागणार आहे.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER