उदयनराजेंना वाढदिवसालाच मिळणार मंत्रिपदाचं गिफ्ट?

Devendra Fadnavis - Amit Shah - Udayan Raje Bhosale

सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपाने केलेली आहे. ३ एप्रिलला राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार असून यातील एका जागेवर उदयनराजे भोसले यांची खासदार म्हणून वर्णी लावण्यात येणार आहे.

शिवसेनेला धक्का : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांचा मनसेत प्रवेश

मात्र त्यासाठी ३ एप्रिलची वाट न पाहता उदयनराजे भोसले यांच्या २४ फेब्रुवारी या वाढदिवसाच्या दिवशी भाजपाकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रिपद देण्याची घोषणा होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भरपाई करताना उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचा शब्द खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. म्हणून भाजपाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच उदयनराजे यांच्या समर्थकांतही याबाबत चर्चा सुरू आहे. आता वाढदिवशी उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून कोणते गिफ्ट मिळणार याची सातारकरांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी सात खासदार ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजपा), राजकुमार धूत (शिवसेना), हुसेन दलवाई (काँग्रेस), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.