उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच – मुख्यमंत्री

CM

सातारा : स्थानिक आमदारांच्या विरोधानंतर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. याबाबत एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘सध्या घडणाऱ्या घडामोडीवरून राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याकरता जागा उरलीय असं तरी सध्या वाटत नाही. ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचे स्वागतच असेल, त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नाही,’ असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यानी दिले आहे.

ही बातमी पण वाचा : आघाडी सरकाच्या 15 वर्षाच्या तुलनेत आमची कामगिरी दमदार : मुख्यमंत्री

भाजपाने पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजघराण्यातील व्यक्तींना पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू केला आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनीच विरोध केल्यामुळे खासदार उदयनराजेंना उमेदवारी मिळणार किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. जर खासदार उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना आपल्या पक्षात घेण्यास कोणताही पक्ष उत्सुकच असेल, त्यामुळे ते कोणाकडे जाणार, हे फक्त ते स्वत:च सांगू शकतील, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. उदयनराजेंना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत उदयनराजेंसाठी भाजपाचे दरवाजे उघडे असल्याचेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.