जाणता राजा म्हणून महाराजांच्या नावाने राजकारण नको, उदयनराजेंचा पवारांना टोला

udayanraje bhonsle- sharad pawar

पुणे :- जय भगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. यावेळी उदयनराजेंनी जय भगवान गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली. महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, अनेक जाती धर्मातील लोक माझे जीवलग मित्र, कुठल्याही देशात धार्मिक स्थळी योद्ध्यांचा फोटो नसतो, केवळ आपल्या शिवरायांचा फोटो असतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला. असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

मी राजघराण्यात जन्माला आलो हे माझं सौभाग्य समजतो. आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केलं. सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली. सोयीप्रमाणे लिखाण करायचं? त्याला बाळकडू दिल नव्हतं, मानधन दिले नव्हते, असा हल्लाबोल उदयनराजे भोसलेंनी केला.

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा मला प्रश्न पडतो. या पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मी या कुटुंबामध्ये जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे मला याचा अभिमान आहे. महाराजांबद्दल कोणीही उठसूट यायचं आणि काहीही बोलायचं असं चालणार नाही,” असं उदयनराजे म्हणाले.