मराठा आरक्षणाच्या लढाईचं नेतृत्व उदयनराजेंनी करावं- विनायक मेटे

Vinayak Mete-Udayan Raje Bhosle.jpg

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागले आहे. एकीकडे मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, राजकीय नेतेही संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. मराठा समाजाला परत आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना, अनेक राजकीय पक्ष मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. मात्र या मागणीमध्ये एकवाक्यता बघायला मिळत नाही. म्हणून मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी करावं, असं मत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे या संदर्भामध्ये विनायक मेटे हे उदयनराजे भोसले यांना याबाबतचा प्रस्ताव देणार आहे.

या संदर्भात लवकरच मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घ्यावी आणि त्याचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार केवळ पोकळ आश्वासन देत आहे. अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांना एकाच मंचावर आणून आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेटे यांनी केले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सर्व पक्षनेत्यांसोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांकडून फक्त पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हेदेखील (Sharad Pawar) कधीही मराठा आरक्षणावर कधीही बोलले नाहीत.

समाज त्यांना मानतो, मात्र समाजासाठी ते बोलायला तयार नाहीत, असा आरोप विनायक मेटे यांनी पवारांवर केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यात अनेक संघटना, राजकीय पक्ष आणि नेते वेगवेगळ्या आंदोलनाची हाक देत आहेत. मात्र मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आंदोलनाची गरज असून यासाठी सगळे मराठा समाजातील नेते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करावे, असे आवाहनही मेटे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER