उदयनराजे-रामराजे गळाभेट; वर्चस्ववाद सुटण्याची चिन्हे

Udayan Raje-Ram Raje

पुणे : ऐन उन्हाळ्यात एकमेकांची उणीदुणी काढणारे, ऐन पावसाळ्यात एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करणारे सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील दोन बलाढ्य नेत्यांची ऐन गुलाबी थंडीत मात्र सातारकरांचा डोळा चुकवत गळाभेट होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदर उदयनराजे भोसले व फलटण संस्थानचे अधिपती विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची पुण्यात गळाभेट झाली. ‘तुझ्या गळा-माझ्या गळा, गुंफू विवाह सोहळ्यातल्या माळा’ अशी दोघांची देहबोली राहिली. छत्रपती उदयनराजे व अधिपती रामराजे यांच्यामधील सत्तासंघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना या दोन्ही तलवारीचा खणखणाट एकाच म्यानात सुरू असायचा. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी कानावर हात ठेवले तरी दोघांचा कलकलाट कमी व्हायचा नाही.

सातारा जिल्ह्यातला हा वर्चस्ववाद अनेक टप्प्यांवर वाढत गेला. रामराजे व उदयनराजे यांच्या पक्षीय वाटा वेगळ्या झाल्यानंतरही या संघर्षाला वादाची किनार कायमच राहिली. मात्र, दोन्ही राजेंना घराण्याचा उत्तम वारसा असल्याने दोघांमधील हे वितुष्ट मिटावे यासाठी प्रयत्न सुरू होते. दोनच महिन्यांपूर्वी साताऱ्याच्या विश्रामगृहावर रामराजे निंबाळकर बसले असताना खा. उदयनराजेंची अचानक एन्ट्री विश्रामगृहावर झाली. दोघांमध्ये बसल्या बसल्या हास्यविनोद झाला. संघर्षाचे वातावरण हलके फुलके झाले. ‘निवांत भेटू या’ म्हणून एकमेकांचा दोघांनीही निरोप घेतला. महाराष्ट्रातील जनतेने या आकस्मिक व धावत्या भेटीचे स्वागत केले. उदयनराजे व रामराजे यांच्यातील संघर्ष निवळायला हवा असाच सूर त्यानंतर माध्यमांमधील चर्चांमधूनही रंगला. विश्रामगृहावर दोघे एकत्र बसले होते.

मात्र, त्यावेळी गळाभेट झाली नव्हती आणि जादूची झप्पीही राहिली होती. या भेटीचा दुसरा पार्ट दोन दिवसांपूर्वी पुण्यात झाला. राजघराण्यातील एका विवाह सोहळ्यानिमित्ताने दोघे पुन्हा एकत्र आले. या खेपेला उदयनराजेंनी रामराजेंना सोडले नाही. दोघेही एकमेकांच्या जवळ आल्यावर व्हायचा तो हास्यविनोद झालाच. दोघांची गळाभेटही झाली. पक्षीय मतभेदाच्या पलिकडे जाऊन राजकारण करताना शिवघराणी एकदिल असली पाहिजेत, ही अपेक्षा या घराण्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली तर त्यात वावगे काहीच नाही. उन्हाळ्या-पावसाळ्यात यथेच्छ भांडलेले राजे गुलाबी थंडीत ‘तुझ्या गळा – माझ्या गळा’ करत असतील तर राजकारणातील खिलाडूवृत्तीचा हा आणखी एक टप्पा जिल्ह्याच्या शांततेसाठी सुचिन्ह ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER