पवार मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते, आरक्षणावर नक्कीच तोडगा काढतील : उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Letter To Sharad Pawar

नवी दिल्ली : राष्ट्रवादीला (NCP) रामराम ठोकून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेले राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तब्बल वर्षभरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले की, शरद पवार हे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते महाराष्ट्रतील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) सहभागी असल्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. अन्यथा मोठा उद्रेक होईल. या आधीचे मोर्चे शांततेत निघाले. परंतु आता काय होईल याची कल्पना करता येणार नाही, असा इशारा भाजपा खासदार उदयनराजे यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिक लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत, अशी मागणी केली. राज्यातील सरकार पवारांमुळेच सत्तेत आहे. त्यांनीच या सरकारची बांधणी केली. यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांचीदेखील जबाबदारी आहे, असे उदयनराजे म्हणाले.

जर तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगावे. सरळ श्वेतपत्रिका काढा, पण मराठा समाजाचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका. राज्याने आधीच कायदा केला आहे. ती राज्याची जबाबदारी, केंद्राची नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले. मी नेहमीच रस्त्यावर असतो, उद्रेक होण्याची शक्यता आहे. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासह देशाची अस्मिता आहे. यामुळे सर्वांच्या मनात भावना असतात. उत्सव साजरा करण्याची तीव्रता पाहता कोरोनामुळे लोकांना धोका होऊ शकतो. यामुळे सरकारने काही बंधने घातली आहेत, असे सांगत उदयनराजेंनी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यास पाठिंबा दर्शविला.

यावेळी प्रसारमाध्यमांनी उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, “हा प्रश्न राजकीय नाही, हा राजकीय मुद्दा नाही. राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. या समाजासाठी सत्तेत जे आहेत महाराष्ट्रात, पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी, ती होताना दिसत नाही.

मी पवारसाहेबांना सांगितलं, आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिलं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER