रत्नागिरीतील मारूती मंदिरमध्ये नवीन शिवपुतळा उभारणार- उदय सामंत यांचा संकल्प

Uday Samant

रत्नागिरी /प्रतिनिधी :- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर भागात सुशोभिकरणाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर सोडला असून शहरातील अन्य ठिकाणीही सुशोभिकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या सुशोभिकरणासाठी रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजन मधून निधी घेतला जाणार आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी शहराच्या मारुती मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा कित्येक वर्षे जुना असल्याने त्याची डागडुजी व परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी अनेक दिवस रत्नागिरीकरांकडून होत होती. या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रत्नसिंधू योजनेअंतर्गत किंवा जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवण्याचा मानस आहे. इतिहासकालीन संदर्भांचा अभ्यास करून, तज्ञांची मतं विचारात घेऊन महाराजांचा एक तेजस्वी पुतळा या ठिकाणी उभारावा, असा संकल्प मंत्री सामंत यांनी केला आहे. शिवाय या परिसराचे सुशोभिकरण देखील करण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्हा शासकीय रूग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथील सर्कल, जयस्तंभ, लक्ष्मी चौक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा येथील सर्कलचे देखील सुशोभिकरण करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी शिवजयंतीदिनी घेतला आहे.