राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवार यांना भेटणार- उदय सामंत

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावे अशी विनंती आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी इथे पत्रकार परिषदेत दिली. आपली यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंड्या साळवी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित होते. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर त्याबाबत अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत निर्णय होऊ शकेल. मात्र निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असा दावा उदय सामंत यांनी केला.