हैदराबादचे मराठी महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राज्य शासनाची सर्वतोपरी मदत – उदय सामंत

मुंबई  :- तेलंगणा शासनाने हैदराबाद येथील मराठी महाविद्यालयास सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी (ग्रॅन्ट इन ऐड) Grant in Aid हा दर्जा बदलून Self Financed दर्जा दिला आहे. या संदर्भात तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. श्री. सामंत म्हणाले, राज्य शासन याबाबत सकारात्मक असून हैदराबाद येथील मराठी महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. याबाबत तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन अडचणी सोडविल्या जातील.

श्री. सामंत यांनी मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवधर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून महाविद्यालयाच्या अडचणी संदर्भात माहिती घेतली. महाविद्यालयाला लवकरच भेट देण्यात येईल. हे महाविद्यालय सुरू राहावे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासन मदत करेल असेही श्री.सामंत यांनी संगितले. अशा प्रकारे इतर राज्यातील मराठी महाविद्यालयांचाही आढावा घेण्यात येईल आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते राज्य शासन करेल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.