यापुढे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव

Uday Samant

नागपूर : राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नागपुरात केली. घराबाहेर असलेल्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आईचं प्रेम महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांना आईच्या प्रेमाची ऊब मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केली जातात. त्यात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय माफक दरात केली जाते. यापुढे बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव दिलं जाईल असं सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यावर केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, नामकरण जरुर करा. पण वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय, लाईट, पाणी अशा सर्व सुविधा आधी उपलब्ध करुन द्या. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचं नावही ‘मातोश्री’ आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांना खूश करण्यासाठी सामंतांनी हा निर्णय घेतला असवा. नाव बदलून वसतिगृहांची व्यवस्था बदलणार आहे का? असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला.

दरम्यान, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन आज भाजपनं राज्यभरात महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलं. उदय सामंत यांनी भाजपच्या या आंदोलनावर टीका केली. भाजपचं हे आंदोलन म्हणजे फक्त पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव आणि त्याला होणाऱ्या विरोधाकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असल्याचं सामंत यांनी म्हटलं. अच्छे दिन येणार म्हणणारे सांगत होते की, भाव स्थिर राहतील. पण प्रत्यक्षात तसं होताना दिसून येत नाही. दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसाम्यान नागरिकांची मोठी आर्थिक परवड होत असल्याचं सामंत यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER