आयपीएल आयोजक युएईमध्ये नियमीत होतात महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा

IPL 2020 - UAE

भारतियांसाठी संयुक्त अरब अमिरातीची (UAE) ओळख आतापर्यंत म्हणाल तर शारजा (Sharjah) आणि तेथील क्रिकेटमुळे (Cricket) होती. दुबई, अबुधाबीपेक्षाही सामान्य भारतियाला अजुनही अमिराती म्हटले तर आधी शारजाच आठवते. आता या शारजासह दुबई व अबुधाबीत क्रिकेटचा मोठा सोहळा, इंडियन प्रिमियर लिग (IPL) 19 तारखेपासून रंगणार आहे.

कितीतरी वर्षांपासून भारतीय संघ शारजात क्रिकेट खेळलेला नाही आणि पाकिस्तानच्या संघाने अमिरातीला आपले दुसरे घर बनवले असले तरी आपला त्याच्याशी संबंध आलेला नाही. पण आता आयपीएलमुळे पुन्हा त्या जुन्या आठवणी जागल्या आहेत.

मात्र केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळांसाठीही या देशाने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचे संघ किंवा त्यांच्या खेळाडूंच्या यशाने ही ओळख नाही तर स्पर्धा आयोजक म्हणून ही ओळख आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात, फूटबाॕल, टेनिस, टेबल टेनिस, रग्बी, फाॕर्म्युला वनच्या महत्त्वाच्या स्पर्धा होतात. त्यामुळे या देशात जिथे त्यांचे खेळाडू फारसे नाहीत, त्यांचे संघ नाहीत तिथे एवढ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन का व कसे होते हा मोठा उत्सुकतेचा विषय आहे.

अबूधाबिला तर गेल्यावर्षीच्या जागतिक पर्यटन पुरस्कारांमध्ये जगातील आघाडीचे क्रीडा पर्यटन स्थळ हा पुरस्कार देण्यात आला होता.

आता आयपीएलचे पूर्ण सत्र पहिल्यांदाच तिथे खेळले जात आहे पण कुणास ठाऊक, हे आयोजन यशस्वी झाले तर आयपीएलसाठी ते नेहमीचे आयोजन स्थळ बनेल किंवा त्यांची स्वतःची लीग ते सुरु करतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

अमिरातीने आॕलिम्पिकमध्ये फक्त एक सुवर्ण व एक कास्यपदक जिंकले आहे पण तरी ते खेळांचे एवढे दिवाने कसे याचे उत्तर तेथील लोकसंख्येच्या गणितावर आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी 88 टक्के जनता ही परदेशातुन युएईत आलेली आहे हे याचे कारण आहे.

आज जागतिक क्रिकेटचे नियंत्रण करणारी संस्था आयसीसीचे मुख्यालय दुबईत आहे. त्यांचे दोन स्टेडियम तिथे आहेत. शारजातील स्पर्धा सर्वांनाच माहीत आहेत. स्वतः युएईचा संघ मात्र फारसा यशस्वी नाही. 1996 व 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत ते खेळले पण एकच सामना जिंकले आहेत.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ फूटबॉल मध्ये त्यांचा संघ जगात 71 वा आणि आशियात आठव्या स्थानी आहे. त्यांनी 2003 मध्ये 20 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा आणि चार वेळा फिफा क्लब वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. सुप्रसिध्द फूटबाॕल क्लब मँचेस्टर सिटीची मालिका अबुधाबीच्या राजघराण्याचे सदस्य शेख मन्सूर बिन झायेद अल नाह्यान यांच्याकडे आहे. त्यांच्यासह बायर्न म्युनीक, मँचेस्टर युनायटेड, अर्सेनल, लिव्हरपूल हे अमिरातीत सराव शिबीरे घेत असतात. गेल्या अबूधाबीत ब्राझीलनेही एक प्रदर्शनी सामना खेळला होता.

टेनीसच्या एटीपी व डब्ल्युटीए टूरच्या महत्त्वाच्या स्पर्धा दुबई येथे होत असतात आणि त्यात जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी होतात. याशिवाय येथे मिळणाऱ्या करसवलतीमुळे बोर्ना कोरीक, कॕरेन खाचनोव्ह, लुकास पोईल अशा टेनिसपटूंनी दुबईतच राहणे पसंत केले आहे. आता तर राॕजर फेडररनेसुध्दा दुबईत अपार्टमेंट घेतल्याची चर्चा आहे. मात्र अमिरातीचा नंबर वन टेनिसपटू जागतिक क्रमवारीत 805 व्या स्थानी आहे.

दुबईतच2010 व 2015 च्या वर्ल्ड टीम कप टेबल-टेनिस स्पर्धा पार पडल्या आहेत. चीनी संघाचे ते चार वर्ष प्रायोजक होते.

दुबईनेच 2014 ते 2017 अशी सलग चार वर्षे वर्षाअखेरच्या सुपर सिरीज फायनल या प्रतिष्ठेच्या बॕडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

फाॕर्म्युला वन सर्किटमध्ये अबु धाबी ग्रँड प्रिक्सचे नियमीत स्थान आहे. 2009 पासून ही स्पर्धा तीथे होत आहे पण अमिरातीचा स्वतःचा अजुनही दखल घ्यावा असा एकही ड्रायव्हर नाही.

रग्बीच्या दुबई रग्बी सेव्हन्स या स्पर्धेचेही ते आयोजन करतात. यासाठी त्यांनी तिथे खास स्टेडियम उभारले आहे आणि केवळ पुरुषांच्याच नाहीतर महिलांच्याही रग्बी सेव्हन स्पर्धेचे ते आयोजन करतात.

गोल्फमध्ये दुबई डेझर्ट क्लासिक व डीपी वर्ल्ड टूर चॕम्पियनशीप या मानाच्या स्पर्धांचेही ते आयोजन करतात. पीजीए युरोपियन टूरच्या या स्पर्धा एक,भाग आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER