आठ दिवसांत सरकारचा यु-टर्न; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती

Nitin Raut

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकाराने (Thackeray Government) शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा शॉक दिला आहे. ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार आहे, अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. 2 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत, अशी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानंतर आता फक्त आठ दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांवर वाढीव वीजबिलाची टांगती तलवार कायम असल्याचे म्हटले जात आहे.

विधिमंडळात बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, २ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी थकबाकीदार यांची वीजजोडणी तोडण्यास स्थगितीचे आश्वसन दिले होते. कोरोनामुळे राज्यात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च २०२० ते जून २०२० या कालावधीत कोव्हिडचे निर्बंध कडकपणे राबवण्यात आले. त्यामुळेया कालावधितील वीजदेयके मागील तीन महिन्यांच्या सरासरीवरून देण्यात आले. तसेच इतर वेगवेगळ्या सवलतीसुद्धा देण्यात आल्या. २ मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.

दरम्यान, एकीकडे २ मार्च रोजी वीजकनेक्शन न तोडण्याचे आश्वासन देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना शॉक बसल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER