दोन वर्षांतील पेट्रोलचा उचांकी दर

petrol price

नवी दिल्ली :- पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच असून तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल दरात २७ पैशांची तर डिझेल दरात २५ पैशांची वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८३.१३ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ७३.३२ रुपयांवर गेले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर आता दोन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर आले आहेत.

मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. क्रूड तेलाचे प्रतिबॅरलचे दर ५० डॉलर्सच्या आसपास पोहचले आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांकडून दरवाढ सुरू आहे. तेल कंपन्यांनी मागील १५ दिवसांत १३ वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये दिल्लीत पेट्रोलचे दर ८३ रुपयांच्या आसपास होते.

हा दर आता गाठला गेला असून क्रूड तेल वधारले तर पेट्रोल, डिझेलच्या दरात भविष्यातही वाढ होऊ शकते. गेल्या १६ दिवसांत पेट्रोल दरात सरसकट २.०७ रुपयांची वाढ झाली असून डिझेल दरात २.८६ रुपयांची सरसकट वाढ झाली आहे. शनिवारच्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर ८९.७८ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ७९.९३ रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर क्रमशः ८४.६३ व ७६.८९ रुपयांवर गेले असून चेन्नईमध्ये इंधन क्रमशः ८६ आणि ७८.६९ रुपयांपर्यंत कडाडले आहे. नोएडा, लखनौ, पाटणा येथे पेट्रोल क्रमश: ८३.२३ रुपये, ८३.१४ रुपये आणि ८५.६९ रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे डिझेल क्रमशः ७३.७४, ७३.६६ आणि ७८.५७ रुपयांवर गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER