प्रस्तावित वाटद एमआयडीसीत दोन हजार युवकांना रोजगार मिळणार-उदय सामंत

MLA Uday Samant

रत्नागिरी(प्रतिनिधी) : कोकणात पर्यावरण पूरक उद्योग आणण्यासाठी वाटद येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीबाबत आपण आग्रही आहोत. ९१७ हेक्टर जागेत उभ्या असलेल्या या एमआयडीसीमध्ये दोन हजार स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्प आवश्यक आहेत. मात्र ते प्रकल्प प्रदुषण विरहित असावेत अशी आपली मागणी आहे. कोणत्याही प्रकल्पांना सरसकट विरोध करणे योग्य नाही. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन एमआयडीसी प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्यामध्ये ८० टक्के रोजगार स्थानिकांनाच मिळावेत यासाठी शासनाकडे मागणी केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरात खड्डयांचे साम्राज्य आहे, मात्र अतिवष्टीमुळे रस्त्यांना खड्डे पडले आहे. नगरपालिकेने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. आवश्यकता वाटल्यास त्यासाठी आपली खासगी यंत्रणा वापरून शहर खड्डेमुक्त करणार असल्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले. काही राजकीय मंडळी खड्डयांचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून निवडणुका आल्यानंतर यांना शहरातील विविध समस्यांची जाणीव होते असा टोला त्यांनी यावेळी मारला.