वाचनप्रेरणेचे दोन शिलेदार…

Dr. APJ Abdul Kalam

Shailendra Paranjapeआपला देश एक समर्थ राष्ट्र बनू शकेल पण त्यासाठी आपण सामर्थ्यवान व्हायला हवं. एक गरीब राष्ट्र किंवा प्रगतीशील राष्ट्र याऐवजी प्रगत राष्ट्र, समर्थ राष्ट्र व्हायला हवं, ही इच्छाशक्ती राष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यात भारतरत्न आणि दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांचा मोठा वाटा आहे.

लोकांचे राष्ट्रपती किंवा पीपल्स प्रेसिडेन्ट म्हणून डॉ. कलाम ओळखले जात कारण ते लोकांना सहजी भेटत. डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनी १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुरुवात केली.

बोरिवली स्थानकावर झालेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात २०१७ साली एक अविस्मरणीय प्रसंग घडला होता. बोरिवली स्थानकावर लाल डगल्यातले ९० हमाल आणि दोनशे मुंबईचे डबेवाले दिवसभर धावपळ करून रोजीरोटी कमावतात. या स्थानकावर कुली आणि डबेवाले यांना आराम करण्यासाठी तिकीट खिडकीच्या मागच्या बाजूला छोटासा हॉल आहे.

या हॉलमधे विश्रांती घेताना हमाल आणि डबेवाले यांना थोडा वेळ एखादं पुस्तक चाळायला मिळालं, ते डोळ्याखालून गेलं तर चांगलं, या उद्देशानं तत्कालीन मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी या जागेत दोनशे मराठी पुस्तकं असलेलं एक छोटं कपाट पुस्तकांसह भेट दिलं. कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, तावडे आणि हमाल तसंच डबेवाले बांधव आले होते.

कार्यक्रमानंतर तावडे यांनी कुली बांधव आणि डबेवाले यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्या वेळी मारुती जगताप या दहावीपर्यंत शिकलेल्या हमाल बांधवानं तावडे यांना विचारलं की साहेब तुम्ही ही पुस्तकं दिली आहेत, याच्यात वि. स. खांडेकर यांचं ययाति आहे का ? तावडे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एका हमालानं ययाति पुस्तकाची मागणी का केली, ही उत्सुकता दाखवत तावडे यांनी विचारले की तुम्हाला तेच पुस्तक का वाचायचेय ? तर जगताप यांनी सांगितलं की ते १९९५ साली दहावी झाले आणि नंतर मुंबईला येऊन हमाली करू लागले पण शालेय वयात ययाति वाचलं होतं कारण वि स खांडेकर यांना मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ते फारसं कळलं नव्हतं म्हणून पुन्हा वाचायचं होतं.

बोरिवली स्थानकावर या पुस्तकांच्या कपाटाची काळजी घेत पुस्तकांची नोंद ठेवण्याचं काम बापू धनके यांनी स्वीकारलंय. तेही हमाली करतात. त्यांच्याशी बोलल्यावर तर आणखी एक धक्का बसला.

बापू धनके म्हणाले की तुम्ही इंग्रजी पेपरचे वार्ताहर आहात त्यामुळं तुमचं मराठी वाचन किती आहे, माहीत नाही. इथं सरकारनं दोनशे पुस्तकं दिलीत पण माझ्या घरी या दोनशे अडीचशे पुस्तकांपेक्षा जास्ती पुस्तकं असलेलं स्वतःचं पुस्तकभांडार आहे. मी उडालोच आणि त्यांना विचारलं की तुम्ही कुठली पुस्तकं वाचता?

धनके यांचे उत्तर चकित करणारं होतं. ते म्हणाले, आपल्या समाजाला पुढं न्यायचं असलं तर थोरामोठ्यांची चरित्रं वाचायला हवीत. त्यातही महात्मा फुले, शाहू महाराज आणि गोपाळ गणेश आगरकर अशा सुधारकांची चरित्रं वाचली तर आपला समाज पुढं जाईल.

क्षेपणास्त्रविकास कार्यक्रम आणि आर्थिक शक्ती देशाला नक्कीच समर्थ बनवेल. पण त्याबरोबरच मनाची मशागत करून हमालीचं काम करतानाही ययातिसारखं पुस्तक वाचण्याची इच्छा बाळगणारे मारुती जगताप आणि घरी पुस्तकभांडार ठेवण्याची श्रीमंती हमाली करूनही उमजलेले बापू धनके, हेही राष्ट्रउभारणीला हातभार लावतच असतात.

कलाम यांचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रात काम करताना आपल्यात जगताप आणि धनके यांच्यासारखं पुस्तकप्रेम थोडंसं जरी निर्माण झालं, तरी वाचनप्रेरणा दिन साजरा झाल्यासारखं होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER