शेतकरी आंदोलनात फूट : हिंसाचारानंतर दोन संघटनांची आंदोलनातून माघार

शेतकरी आंदोलन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Law) दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात बुधवारी फूट पडली. प्रजासत्ताकदिनी (Republic Day) दिल्लीत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) दरम्यान हिंसा भडकल्याने भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचं संघटनांच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केलं. दोन संघटनांनी अचानक आंदोलनातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी आंदोलनासाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियनने (भानू) आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इथून पुढे ही संघटना या आंदोलनात राहणार नाही. अशा प्रकारे आंदोलन चालत नसतं. ज्यांचा हिंसाचाराचा मार्ग आहे त्यांच्यासोबत आम्ही आमचं आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आंदोलन चालू ठेवण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. इथं कुणाला मार खाण्यासाठी किंवा शहीद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत सरकारसोबत चर्चेला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. टिकैत सरकारसोबत चर्चेला गेले; पण त्यांनी तिथे उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला का? त्यांनी धान खरेदीबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडलेत का? आम्ही केवळ पाठिंबा देतो आणि काही लोक नेते बनत आहेत. हे आपलं काम नाही. हिंसेशी आमचं काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.

भारताचा ध्वज, त्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणं हे सर्वांचं काम आहे. ध्वजाच्या प्रतिष्ठेला कुणी धक्का पोहचवला असेल तर तशी कृती करणारे चुकीचे आहेत आणि ती कृती करू देणारेही चुकीचे आहे. आयटीओमध्ये एक शेतकरी शहीद झाला. या शेतकऱ्याला जी व्यक्ती रॅलीत घेऊन गेली होती तिच्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानुप्रताप सिंह चिल्ला बॉर्डर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, दिल्लीत काल जे काही घडलं यानं मला खूपच दुःख झालं. त्यामुळे आम्ही ५८ व्या दिवशी आमचं आंदोलन थांबवत आहोत. भाकियूच्या या गटाला संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच आंदोलनापासून वेगळं केलं होतं. कारण सुरुवातीला सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सर्व शेतकऱ्यांच्या भावना पाहता त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं, अशी माहिती ठाकूर भानुप्रताप सिंह यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER