१५ दिवसांत आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे ! चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार ठरवण्याचा त्यांनी जणू विडाच उचललेला दिसतो. तुम्ही जर प्रत्येक समस्येला जबाबदार धरणार असाल तर ते राज्य तरी कशाला चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच हवाली करून द्यावे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा उलट प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला. ते गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आगामी १५ दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात येईल, असा गौप्यस्फोटही केला. मी अमित शहा (Amit Shah) किंवा तपास यंत्रणांच्या संपर्कात आहे, म्हणून मला ही माहिती मिळते असे नव्हे. तर हा महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा एक अंदाज आहे. मला जर माहिती असती तर तुम्हालाही सोबत नेलं असत. क्रिकेटमध्ये जसं सुरुवातीचे दोन फलंदाज बाद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर पुढचे पटापट फलंदाज ढेपाळतात, असे सूचक विधानही चंद्रकांत पाटील यांनी केले. सचिन वाझे याने अनिल परब (Anil Parab) यांच्यावर पत्र लिहून आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याविषयी शंका उपस्थित करत आहेत.

मात्र, हेच सचिन वाझे कालपर्यंत सरकारला प्रिय होते. अधिवेशनाचा एक मिनिटही बहुमूल्य असतो. मात्र, याच सचिन वाझेला पदावरून दूर करण्यासाठी अधिवेशन नऊ वेळा तहकूब करावे लागले, अनिल परब यांनी प्रत्येक वेळी त्याचा बचाव केला. तुम्ही जर काही केलंच नसेल तर बाळासाहेबांची शपथ घेऊन त्रागा का करत आहेत? कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा सल्ला परब यांना दिला. राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलातील संघाशी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असे विधान केले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातील (Kolhapur) पूरपरिस्थिती प्रत्येक वेळी संघ मदतीसाठी धावून आला आहे. तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मध्ये आणू नका, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

ही बातमी पण वाचा : अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठीही न्यायालयाची वाट बघणार का? चंद्रकांत पाटील यांचा प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button