मुंबई येथे चोरीच्या मोबाईल विक्रीप्रकरणात आणखी दोघांना अटक

Two more arrested in theft of mobile phones.jpg

मुंबई : चोरीचे मोबाईल्सचे आयएमईआय नंबर बदली करुन ते विक्री करत असलेल्या टोळीतील आणखी दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. इरफान यासीन खान आणि अर्शद तुफेल अहमद अन्सारी अशी या आरोपींची नावे असून दोघांनाही स्थानिक न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

चोरी केलेल्या मोबाईल्सचे आयएमईआय नंबर बदली करुन त्यांच्या विक्रीची एक मोठी डील मानखुर्दमध्ये होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष सहाला मिळाली होती. याच माहितीच्या पोलीस पथकाने मानखुर्द गाव रिक्षा थांब्याजवळ सापळा रचून कर्नाटक आणि केरळमधील रहिवाशी असलेल्या मन्सूर सुलेमान (30) आणि इब्राहीम मोईद्दीन (25) या दोघांना अटक केली. गुन्हे शाखेने पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीचे 5 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 58 मोबाईल्स जप्त केले आहेत.

सांगली येथे मोबाईल चोरुन पळणार्‍या चोरट्याला रंगेहाथ पकडले

दोघेही चोरीचे आयएमईआय नंबर बदली केलेले मोबाईल कर्नाटक आणि केरळमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे तपासात समोर आले. गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेल्या या दोघांच्या चौकशीतून इरफान आणि अर्शद यांची नावे समोर आली. पोलिसांनी माग काढत या दोघांनाही गोवंडी येथून मंगळवारी अटक केली.

अर्शदचा गोवंडी येथे मोबाईल सर्व्हिस सेंटरचे एक दुकान आहे. तिथेच काही चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलला जात होता असे तपासात उघडकीस आले आहे.