राजापूर तालुक्यातील शेजवली येथे बिबट्याचे दोन बछडे जेरबंद

Leopard

रत्नागिरी(प्रतिनिधी ): गेले काही दिवस राजापूर तालुक्यातील शेजवली गावात सातत्याने आढळून आलेल्या बिबट्याच्या दोन लहान बछड्यांना वनविभागाने जेरबंद केले आहे. या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात पाठवणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेले काही दिवस शेजवली गावात अनेकदा बिबट्याचे दोन बछडे दिसत होते. सुमारे सहा महिन्यांचे हे बछडे कुणाच्या ना कुणाच्या घरात जात होते. काही दिवसांपूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलांनीही त्यांना पाहिले होते. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे एक बछडा पळाला, तर दुसरा कणगीच्या बेटावर चढून बसला होता. त्यावेळी वन विभागाने त्याची सुटका केली होती. गुरुवारी शेजवलीतील विजय गुणाजी परवडे यांच्या घरात हे बछडे शिरले.

घरातील सर्वांनी केलेल्या आरडाओरडीनंतर दोन्ही बछड्यांनी शेजारी असलेल्या प्रकाश महादेव मांजरे यांच्या घरालगतच्या लाकडाच्या माचाखाली आसरा घेतला. ही माहिती शेजवलीचे उपसरपंच मंदार राणे यांनी राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल घाडगे वनरक्षक संजय रणधीर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. माचाखाली बसलेल्या दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. आता हे दोन्ही बछडे जुन्नर येथील पालन केंद्रात पाठवले जाणार आहेत.