
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पदाधिकारी जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी राबोडी येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, दुचाकीवरून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. संबंधित आरोपीला लखनौच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली.
टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनौ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट- १ च्या ताब्यात दिलं जाणार आहे.
जमील शेखला मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नगरसेवक नजीबुल्लाहने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने शूटर इरफानच्या अटकेनंतर केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जमील शेख मनसे पक्षाचे पदाधिकारी असून एक आरटीआय कार्यकर्ताही होते. ते वारंवार नजीबुल्लाह विरोधात तक्रार करत होते. जमिनीच्या व्यवहारामुळे ही हत्या करण्यात आली, अशी माहिती यूपी एसटीएफने त्यांच्या प्रेसनोटमध्ये दिली आहे.
ठाणे पोलिसांच्या युनिट-१ गुन्हे शाखेने २५ नोव्हेंबर २०२० रोजी पहिल्या आरोपीला ठाण्यातील राबोडी येथून अटक केली होती. या आरोपीचं नाव शाहिद शेख असं आहे. तो सध्या ठाणे जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर दुसऱ्या आरोपीला आता लखनौ येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. मुख्य आरोपीने अटक केलेल्या आरोपींना दोन लाखांची सुपारी दिली होती. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याचाच शोध पोलीस घेत आहेत. आरोपीने जमील यांची सुपारी का दिली याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला