मुंबईतील दोन जैन मंदिरे दिवाळीत उघडण्यास मुभा

रोज सकाळी व संध्याकाळी पूजा-विधी

jain Tempel

मुंबई : दादर (प.) येथील आत्म कमल लब्धीसुरेश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट आणि भायखळा येथील शेठ मोतीशा रिलिजियस अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांची जैन मंदिरे भाविकांना विशेष पूजा व विधी करता यावेत यासाठी दिवाळीचे पाच दिवस उघडण्यास मंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

खरे तर मुंबईतील सर्व १०२ जैन मंदिरे दिवाळीत उघडता यावीत यासाठी या दोन संस्थांनी रिट याचिका केली होती. परंतु न्या. एस. जे काथावाला व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने अशी सरसकट परवानगी न देता फक्त या दोन जैन मंदिरांना परवानगी दिली. त्यानुसार ही दोन जैन मंदिरे १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर असे पाच दिवस रोज सकाळी ६ ते दु. १ व सायंकाळी ६ ते ९ या वेळांत उघडी राहतील. या वेळात एका वेळी फक्त आठ भाविकांना मंदिरात जाता येईल व त्यांना तेथे फक्त १५ मिनिटे थांबता येईल.

सरकारने ठराविक नियमांचे पालन करून मॉल, उपहारगृहे, मद्यपानगृहे व व्यायामशाळाही उघडण्यास परवानगी दिली असताना रेल्वे, मेट्रो, मोनोरेल व बसमधूनही प्रवास सुरु केलेला असताना या जैन मंदिरात येऊन भाविकांनी नियमांचे पालन करत ठराविक पूजा व विधी केल्याने कोणाचेही कोणत्याही प्रकारे नुकसान होईल, असे आम्हाला वाटत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. शिवाय हिच दोन जैन मंदिरे पर्यूषण पर्वात व अयानबिल तपासाठी उघडी ठेवू दिली गेली तेव्हा तेथे आक्षेप घेण्यासारखे काहीही घडले नव्हते, याचीही खंडपीठाने नोंद घेतली. एवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने पारशी समाजास डुंगरवाडी येथे जाऊन मृतात्म्यांचे श्राद्ध करण्यास परवानगी दिली होती हे पाहता जैन समाजास परवानगी न देणे हा पक्षपात ठरेल, असेही न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. प्रफुल्ल शहा यांनी असे निदर्शनास आणले की, मुळात जैन धर्म हा अहिंसेचे पालन करणारा आहे व आपल्याकडून सूक्ष्म जीवजंतू जरी मारले गेले तरी जैन ते पाप मानतात. ते एरवीही तोंडाला मास्क लावूनच मंदिरात जातात. तेथे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे व स्वच्छता आणि पावित्र्य राखणे ही या समाजाची हजारो वर्षांची परंपरा आहे. सरकारच्या वतीने विरोध करताना अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांचे म्हणणे असे होते की, मॉल, उपहारगृहे व बार यांची तुलना मंदिरांशी केली जाऊ शकत नाही. पर्यूषण व अयानबिल तपासाठी त्यांना परवानगी दिली हे समजू शकते कारण ते दोन धामिक विधी फक्त जैनांमध्येच आहेत. पण दिवाळी सर्वच जण साजरी करतात. त्यामुळे फक्त जैन मंदिरे उघडू द्यायची व इतर धार्मिक स्थळे बंद ठेवायची हा पक्षपात ठरेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER