राष्ट्रवादीत दोन गट; बहुसंख्य नेते शरद पवारांसोबत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) यांच्याविषयी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उघड-उघड दोन गट पडले आहेत. यात बहुसंख्य नेते शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी बारामती येथे कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत. राष्ट्रवादीच्या सूत्रांच्या माहितीनुसार पार्थचे प्रकरण अचानक उद्भवले नाही. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्याविषयी आणि ते त्यांच्या कारवायांबाबत शरद पवार यांना माहिती देत होते. काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दल काय बोलतात, हे शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे समजते.

मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर काही नेत्यांनी पार्थ यांना मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. मात्र पार्थने मावळशी संपर्क ठेवला नाही. अजित पवार यांचे सोशल मीडिया पार्थच हाताळत होते. पक्षातल्या काही नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणे हे पार्थच्या सांगण्यावरून घडले. नेत्यांच्या बाबतीत पार्थचा होणारा हस्तक्षेपदेखील शरद पवार यांच्या नाराजीचे कारण ठरला, असेही सूत्रांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. आपल्याला तीच भूमिका घ्यावी लागेल. माझ्या कुटुंबातील व्यक्तीनेच त्याला छेद देणारी भूमिका घेणे पक्षहिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी पार्थला समज दिल्याचे कळते.

सुप्रिया सुळेंची धावपळ
पार्थवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान कौटुंबिक आणि पक्षीय कलहात होऊ नये यासाठी खा. सुप्रिया सुळे पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER