दोन कोरोनाप्रतिबंधक लशींना मिळाली मर्यादित वापराची मान्यता

Covishield - Covaxin - Coronavirus Vaccine
  • ‘सेरम इन्स्टिट्यूट’ व ‘भारत बायोटेक’ कंपन्यांचे यश

नवी दिल्ली : ‘सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची ‘किविशिल्ड’ (Covishield) व  भारत बायोटेक कंपनीची ‘कोवॅक्सिन’ (Covaxin) ya देशात  उत्पादित करण्यात आलेल्या दोन कोरोना प्रतिबंधक लशींचा आपत्कालिन परिस्थितीत मर्यादित स्वरूपात वापर  ( Restricted Emergency Use) करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

भारताचे औषधीद्रव्य महानियंत्रक ( Drugs Controller General of India) डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मे. कॅडिला हेल्थकेअर लि. या आणखी एका औषध उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या ‘एन कॉव्ह व्हॅसिन’ या कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील ‘क्लिनिकल’ चाचण्या घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे डॉ. सोमाणी यांनी सांगितले.

या तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या लशींविषयी सादर केलेल्या प्रयोगात्मक माहितीवर केंद्रीय औषधीद्रव्य मानक नियंत्रण संघटनेने ( Central Drugs Standard Control Organisation (CDSCO)) शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या बैठकीत सखोल विचार करून केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सोमाणी म्हणाले. दोन लशींना मर्यादित स्वरूपात प्रत्यक्ष रुग्णांवर वापर करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्या लशींच्या सध्या देशात घेण्यात येत असलेल्या प्रगत चाचण्याही सुरु राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅस्ट्रा झेनेका ही बहुराष्ट्रीय कंपनी व इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने मिळून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित केली आहे. त्यांनी हस्तांतरित केलेले तंत्रज्ञान वापरून सेरम इन्स्टिट्यूट लशीचे उत्पादन त्यांच्या पुणे येथील कारखान्यात करत आहे. या लशीचे पूर्ण शास्त्रीय नाव ‘रिकॉम्बिटन्ट चिम्पान्झी अ‍ॅडेनोव्हायरस व्हेक्टर व्हॅसिन’ ( Recombinant Chimpanzee Adenovirus vector vaccine ) असे आहे.

सेरम इन्स्टिट्यूटला तंत्रज्ञान हस्तांतरित केले जाण्यापूर्वी या लशीच्या अन्य देशांमध्ये १८ वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या २३,७४५ व्यक्तींवर ‘क्लिनिकल’ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात या लशीची परिणामकता (Efficacy) ७०.४२ टक्के असल्याचा निष्कर्ष निघाला. याखरीज सेरम इन्स्टिट्यूटने या लशीचे स्वत: उत्पादन केल्यावर तिच्या भारतातील १६०० स्वयंसेवक व्यक्तींवरही ‘क्लिनिकल’ चाचण्या घेतल्या. या सर्व चाचण्यांच्या सुरक्षा, प्रतिकारक्षमता व परिणामकता या संबंधीच्या सर्व सविस्तर तांत्रिक माहितीसह सेरम इन्स्टिट्यूटने मंजुरीसाठी अर्ज केला होता. या विषयाशी संबंधित तज्ज्ञ समितीने या सर्व माहितीचा अभ्यास करून आपले मत ‘सीडीएससीओ’ला सादर केले. त्याचा साकल्याने विचार करून या प्राधिकृत संघटनेने आपत्कालिन परिस्थितीत या लशीचा वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस केली. ही परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे.

मे. भारत बायोटेक कंपनी उत्पादन करत असलेल्या ‘कोवॅक्सिन’ लशीचे संपूर्ण शास्त्रीय नाव ‘ होल व्हिरिऑन इनअ‍ॅक्टिव्हेटेड कोरोना व्हायरस व्हॅक्सिन’ ( Whole Virion Inactivated Corona Virus Vaccine ) असे आहे. कंपनीने ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) व भारत सरकारच्या पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ (NIV) यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. कंपनीने या लशीच्या आधी प्रयोगशाळेतील काही प्राण्यांवर व मानवाशी जवळचे जैविक नाते असलेल्या वानर प्रजातीच्या प्राण्यांवर चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर देशातच सुमारे ८००  व्यक्तिंवर पहिल्या व दुसºया टप्प्याच्या ‘क्लिनिकल’ चाचण्या करण्यात आल्या. तिसºया टप्प्याची परिणामकता चाचणी (Efficacy Trial) २५,८०० स्वयंसेवक व्यक्तिंवर घेण्याचे ठरले असून आत्तापर्यंत २२ हजारांहून अधिक व्यक्तींवर चाचणी घेण्यात आली आहे. या सर्व चाचण्यांच्या वैज्ञानिक माहितीवरून लशीची परिणामकता व सुरक्षितता याविषयी समाधानकारक निष्कर्ष निघत असल्याने या लशीलाही मर्यादित वापराची परवानगी देण्यात आली आहे.

मे. कॅडिला हेल्थकेअर कंपनीने त्यांची ‘एन कॉव्ह व्हॅक्सिन’ ही लस स्वत: विकसित केली आहे. एक हजार स्वयंसेवक व्यक्तींवरील या लशीच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्याच्या ‘क्लिनिकल’ चाचण्या सुरु आहेत. त्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक असल्याने कंपनीस तिसर्‍या  टप्प्याच्या ‘क्लिनिकल’ चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER