रोहितच्या शतकांत दोन योगायोग आणि एक अनोखा विक्रम

rohit sharma

रोहित शर्माने (Rohit Sharma)चेन्नई (Chennai) येथे इंग्लंडविरुध्दच्या (India Vs England) दुसऱ्या कसोटीत शनिवारी २३१ चेंडूत १६२ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याचे हे कसोटी सामन्यांतील सातवे आणि एकूण ४० वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. यात दोन योगायोग आणि एक विशेष विक्रम केला. त्यातील पहिला योगायोग हा की आपले सातच्या सात कसोटी शतकं त्याने भारतातच केली आहेत आणि दुसरा योगायोग म्हणजे त्याने कसोटी सामन्यांमध्ये ज्या चार संघाविरुध्द शतकं केले आहेत, नेमक्या त्याच संघांविरुध्द म्हणजे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्याविरुध्दच त्याच्या नावावर टी-२० सामन्यांमध्येही शतकं आहेत.

इंग्लंडविरुध्द रोहितच्या नावावर आतापर्यंत कसोटी शतक नव्हते पण आजच्या १६२ धावांच्या खेळीसह त्याने इंग्लंडविरुध्द कसोटी शतकांचे खाते तर खोललेच, शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार संघांविरुध्द कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारात शतकं करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. इतर कुणालाही दोन पेक्षा अधिक संघांविरुध्द अशी कामगिरी करता आलेली नाही.

वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्क्युलम व मार्टीन गुप्तील आणि आपल्या भारताचा के.एल.राहुल यांनी तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये किमान दोन शतकं झळकावली आहेत. मात्र यांच्यात टी-२० मध्ये चार शतकं करणारा रोहित एकमेव आहे.

रोहितची तिन्ही प्रकारातील शतकं

विरुध्द—— कसोटी– वन डे — टी-२०
द. आफ्रिका — ३ ——३ ——१
श्रीलंका ——- १ —— ६—— १
इंग्लंड ——— १ —— २—— १
वेस्ट इंडिज—– २ —— ३—— १

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER