सांगलीत पुढचा महापौर राष्ट्रवादीचा? भाजपचे ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

NCP Flag

सांगली : महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या ४३ नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २२ नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोंडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे. तर दुसरीकडे आता महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नजरेत भाजपमधील असंतोष आला नसेल तर नवलच. सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावण्याचे नियोजन सुरू केले. तब्बल २२ नगरसेवक भाजपवर नाराज असल्याचेही दिसून आले. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढविला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

राष्ट्रवादीने १२ नगरसेवकांशी अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनपासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला. त्यातील तीन जणांना शहराबाहेर हलविण्याचा डाव फसला. पण नऊ जण मात्र अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील दोघेजण परतले आहे. त्यातील एकाला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर परतावे लागले. तर, एकाला घरगुती अडचणीमुळे माघारी यावे लागले. पण, ते परत आले असले तरी भविष्यात मनाने भाजपासोबत कितपत राहतील, हा प्रश्न आहेच. भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कारभारापासून स्वत: नेहमीच दूर ठेवले आहे. याच नेत्यांमुळे जनतेने महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, भ्रष्ट कारभाराचे शिंतोडे अंगावर नको, या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा हाकत आहेत. आता सत्ता टिकविण्यात भाजपला यश मिळेल की नाही हे मंगळवारी स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER