वॉ’ बंधू आणि क्रिकेटमधील इतर 21 जुळे!

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस (5 एप्रिल) खास आहे. 1991 मध्ये याच दिवशी पुरुषांच्या कसोटी सामन्यात प्रथमच जुळे बंधू सोबत खेळले


1) स्टिव्ह व मार्क वॉ (आस्ट्रेलिया)

आस्ट्रेलियाचे स्टिव्ह वॉ आणि मार्क वॉ यांनी विंडीजविरुध्दच्या पोर्ट आफ स्पेन कसोटीत हा इतिहास घडवला. त्यावेळी स्टिव्ह वॉ संघात चांगला स्थिरस्थावर झालेला होता आणि मार्क वातुलनेने नवा होता मात्र मार्कचाही हा काही पहिलाच सामना नव्हता. 1988 पासून तो वनडे सामने खेळतच होता आणि 1991 मध्येच इंग्लंडविरुध्दच्या अडिलेड कसोटीत त्याने बंधू स्टिव्हचीच जागा घेत कसोटी पदार्पण केले होते. मात्र एकाच सामन्यात हे दोन्ही बंधू सोबत खेळले असे 5 एप्रिल, 1991 च्या आधी झाले नव्हते. पुढील 11 वर्षे हे दोन्ही 108 कसोटी आणि 214 वन डे सामन्यांमध्ये एकत्र खेळले.

स्टिव्ह आणि मार्क हे एकाच कसोटी सामन्यात एकत्र खेळलेले पहिले जुळे बंधू असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले जुळे मात्र नव्हते.

2) एरिक व अलेक बेडसर (इंग्लंड)

वाबंधुंच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेली जुळ्या भावांची जोडी म्हणजे इंग्लंडचे एरिक व अलेक बेडसर. यांच्याबद्दलची एक कहाणी प्रसिध्द आहे ती अशी की या दोघांपैकी कोण जलद गोलंदाज बनेल आणि कोण फिरकी गोलंदाजी करेल याचा फैसला करण्यासाठी त्यांनी नाणेफेक केली होती. त्यानुसार अलेक हा जलद गोलंदाज तर एरिक हा फिरकी गोलंदाज बनला.

हे दोन्ही बंधू 1939 ते 1960 पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. एरिक आणखी दोन वर्ष खेळले. मात्र एरिकची फिरकी इंग्लंडच्या संघात त्याला स्थान मिळवून देऊ शकली नाही. अलेक मात्र चांगले यशस्वी जलद गोलंदाज म्हणून ख्यातकिर्त झाले. त्यांनी 51 कसोटी सामन्यांमध्ये 236 बळी मिळवले.

3) एरिक व अलेक बेडसर (दक्षिण आफ्रिका)

योगायोगाने बेडसर आडनावाचीच आणखी एक जुळ्या बंधूंची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे. योगायोगाचा कहर म्हणजे यांची नावैसुध्दा एरिक व अलेक अशीच होती. फरक एवाढाच की पहिले बेडसर बंधु इंग्लंडमधील तर हे दोघे दक्षिण आफ्रिकेतील इस्ट लंडनचे होते.

4) फेर्नी व आयरीध शेव्हिल (आस्ट्रेलिया)

महिला क्रिकेटच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात 1934 मध्ये आस्ट्रेलियातर्फे जुळ्या बहिणी खेळल्या. फेर्नी ब्लेड-शेव्हिल आणि आयरीन शेव्हिल या त्या बहिणी. यापैकी फेर्नी ही जलद गोलंदाज होती तर रेनी ही यष्टीरक्षक होती. या बहिणींची आणखी एक बहिण, एस्सी शेव्हिल ही फलंदाज होती आणि ती पहिल्या कसोटी सामन्यात फेर्नीसह आस्ट्रेलियन संघात होती.

5) अलेक्स व केट ब्लकवेल (आस्ट्रेलिया)

आस्ट्रेलियातर्फेच खेळलेल्या अलेक्स व केट ब्लकवेल या दोघी तर हुबेहूब सारख्याच दिसणाऱ्या जुळ्या बहिणी खेळल्या. 2004 मध्ये वन डे सामन्यात त्या पहिल्यांदा सोबत खेळल्या. त्यानंतर 2005 च्या विश्वविजेत्या आस्ट्रेलियन महिला संघातही त्या होत्या. दोन्ही मधल्या फळीत फलंदाजी करायच्या. केट चार कसोटी, 41 वन डे आणि सहा टी-20 सामने खेळल्यानंतर फिजिओथेरेपीकडे वळली. अलेक्स मात्र अधिक सफल राहिली. तिने आस्ट्रेलियन महिला संघाचे विश्वविजयी नेतृत्वसुध्दा केले. अलेक्सच्या नावावर 12 कसोटी, 144 वन डे आणि 95 टी-20 सामने आहेत. 2010 च्या टी-20 विश्वविजेत्या आस्ट्रेलियन संघाची ती कर्णधार होती. याशिवाय 2012 व 2014 च्या टी-20 विश्वविजेत्या आस्ट्रेलियन संघाचीही ती सदस्य होती.

6) जेम्स व हमीश मार्शल (न्यूझीलंड)

न्यूझीलंडतर्फे खेळलेले जेम्स व हमीश हे मार्शल बंधूसुध्दा जुळेच! 16 फेब्रुवारी 1979 ला जन्मलेले हे भावंड पुरुषांचे कसोटी क्रिकेट खेळलेले पहिले सारखेच दिसणारे जुळे (आयडेंटीकल) आहेत. 2005 मध्ये आकलंड कसोटीत ते आस्ट्रेलियाविरुध्द सोबत खेळले. 2000 ते 2007 दरम्यान हमीश 13 कसोटी, 66 वन डे आणि तीन टी-20 सामने खेळला तर जेम्स सात कसोटी, 10 वन डे आणि तीन टी-20 सामने खेळला आहे. या दोघांपैकी कोणता कोणहे समजणे फारच अवघड होते असे आस्ट्रेलियन कर्णधार रिकी पोंटींगने म्हटले होते.

7) एलीझाबेथ व रोझ सिग्नल (न्यूझीलंड)

न्यूझीलंडच्याच एलिझाबेथ आणि रोझ या सिग्नल भगिनी 1984 मध्ये कसोटी सामन्यात एकत्र खेळल्या. इंग्लंडविरुध्दच्या हेडिंग्ले कसोटीत त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. रोझचा हा एकमेव कसोटी सामना ठरला मात्र ती सहा वन डे सामने खेळली. एलिझाबेथ सहा कसोटी आणि 19 वन डे सामने खेळली.

8) किशोना व किशिया नाईट (वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिजतर्फे खेळलेल्या पहिल्या जुळ्या क्रिकेटपटू म्हणजे किशोना व किशिया या नाईट भगिनी खेळल्या. किशोना 30 च्या वर वन डे आणि 32 पेक्षा अधिक टी-20 सामने खेळली आहे तर किशिया दोन्ही प्रकारचे चाळीसच्यावर सामने खेळली आहे.

नाईटस् भगिनींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या बार्बेडोससाठी आथलेटिक्स व फूटबॉलसुध्दा खेळल्या आहेत पण क्रिकेटला त्यांनी प्राधान्य दिले. 2016 च्या टी-20 विश्वविजेत्या संघातही त्या होत्या.

9) अनिसा व अलिसा मोहम्मद (वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिजमध्येच अनिसा व अलिसा मोहम्मद यासुध्दा जुळ्या क्रिकेटपटू आहेत पण यापैकी अलीसा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली नाही.

10) सेसिलिया व इसोबेल जायस (आयर्लंड)

आयर्लंड क्रिकेटमध्ये जायस कुटुंबाचे एक-दोन नव्हे तर पाच सदस्य खेळले आहेत. त्यापैकी सेसिलिया व इसोबेल जायस या जुळ्या बहिणी आहेत. त्यांचा भाऊ एड जायस हासुध्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. इसोबेल ही जुलै 2000 मध्येच पाकिस्तानविरुध्द कसोटी सामना खेळली आहे. त्यावेळी 21 धावात सहा बळी मिळवत आयर्लंडच्या विजयात ती प्लेयर आफदी मच ठरली होती. 2017 च्या विश्वचषक पात्रता सामन्यात तर इसोबेलच्या गोलंदाजीवर सेसिलियाने झेल घेत प्रतिस्पर्धी फलंदाज बाद केली होती. इसोबेल एका कसोटीशिवाय 78 वन डे आणि 42 टी-20सुध्दा खेळली आहे तर सेसिलियाच्या नावावर 56 वन डे आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आहेत.

11) बिली व जॉन डेन्टन (इंग्लंड)

नार्दम्पटनशायरचे बिली व जॉन डेन्टन हेसुध्दा जुळे बंधू पण ते शंभराच्यावर प्रथम श्रेणी सामने खेळूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत. याचप्रकारे सॉमरसेटचे डडली रिप्पन व सिडनी रिप्पन यांनासुध्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची संधी मिळाली नाही.

12).एव्हर्टन व डार्लिंग्टन मातंबानाद्झो (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वेसाठी तीन कसोटी सामने खेळलेला जलद गोलंदाज एव्हर्टन मातंबानाद्झो याचा जुळा बंधू डार्लिंग्टन हासुध्दा क्रिकेटपटूच. पण डार्लिंगट्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत प्रगती करु शकला नाही. माईक टेलर व डेरेक टेलर हे इंग्लंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आणखी एक जुळ्या भावंडांची जोडी. माईक हा नाटिंघमशायर व हमौपशायरसाठी तर यष्टीरक्षक डेरेक हा सरे व सामरसेटसाठी खेळला.

13) अझमत व सुल्तान राणा (पाकिस्तान)

पाकिस्तानचे अझमत व सुल्तान राणा हे सुध्दा जुळे बंधू. अझमत 1079-80 मध्ये आॕस्ट्रेलियाविरुध्द एकच कसोटी सामना खेळला. तर केवळ प्रथम श्रेणी क्रिकेटपुरताच मर्यादीत राहिलेला सुलतान हा यष्टीरक्षक होता.

14) जेन व जील पॉवेल (इंग्लंड)

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू जेन व जिल पॉवेल यासुध्दा जुळ्याच. जेन 6 कसोटी आणि 24 वन डे सामने खेळली तर तिच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जिलच्या नावावर एकच कसोटी आणि एकच वन डे सामना आहे.

15) अता उर रहमान व झिया उर रहमान (पाकिस्तान)

पाकिस्तानचा अता उर रहमान व झिया उर रहमान हेसुध्दा जुळेबंधू. यापैकी फक्त अता उर हाच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला. 1996 च्या विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने त्याला वसिम अक्रमच्या जागी खेळवले होते. तो 13 कसोटी आणि 10 वन डे सामने खेळला. या भावंडांचे आणखी दोन मोठे भाऊ होते आणि आश्चर्य म्हणजे दोघांचेही नाव तारिक मेहामूद होते.

16).ब्रायन व डेव्हिड मर्फी (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वेचे ब्रायन व डेव्हिड मर्फी हे जुळे बंधू. यापैकी ब्रायनने नेतृत्वसुध्दा केले. हे दोन्ही भाऊ 19 वर्षाआतील तीन कसोटी सामने आणि याच वयोगटाचा एक वन डे सामना सोबत खेळले आहेत.

17) मार्क व मारित्स जोंकमन(नेदरलँड)

नेदरलँडचे मार्क व मारित्स जोंकमन हे जूळे बंधू अनुक्रमे 16 व चार वन डे इंटरनॅशनल सामने खेळले पण वेगवेगळे.

18) सारा व अडम कोयटे (आस्ट्रेलिया )

न्यू साऊथ वेल्स आस्ट्रेलियाचे सारा व अडम कोयटे ही जुळ्या क्रिकेटपटूंमधील एकमेव बहिणभावाची जोडी. सारा ही मध्यमगती गोलंदाज व तळाकडील फलंदाज आहे. तीचा भाऊ अडम हा 19 वर्षाआतील गटाचे दोन वन डे सामने खेळला आहे.

19) क्रेग व जेमी ओव्हर्टन (इंग्लंड)

इंग्लंडचे क्रेग व जेमी ओव्हर्टन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले जुळे बंधू. जेमी हा जलद गोलंदाजीकरतो. त्याला 2013-14 च्या आस्ट्रेलियावीरुध्दच्या मालिकेसाठी निवडले होते पण संघात संधी मिळाली नाही तर क्रैग ओव्हरटन याने 2017-18 च्या अशेस मालिकेत कसोटी पदार्पण करताना स्टिव्ह स्मिथला त्रिफळाबाद करुन सुरुवात केली होती.

20) सिकंदर, साकिब व असद झुल्फिकार (नेदरलँड)

नेदरलँडचे सिकंदर, साकिब व असद झुल्फिकार हे तर एकाच सामन्यात खेळलेले क्रिकेटमधील एकमेव तिळे आहेत. 2017 मध्ये आमस्टेलव्हीन येथे अमिरातीविरुध्दच्या सामन्यात ते खेळले होते. आयसीसीचा हा मान्यताप्राप्त 50 षटकांचा सामना होता. त्यात असदने 15, साकिबने 11 आणि सिकंदरने नाबाद 41 धावा केल्या. दुर्देवाने या सामन्यावेळी नेदरलँडला अधिकृत वन डे संघाचा दर्जा नव्हता. या त्रिकुटापैकी सिकंदर पुढे 2016 मध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. विशेष म्हणजे या तिळ्या भावंडांचे वडील झुल्फिकार अहमद हे आयसीसी ट्रॉफीत नेदरलँडसाठी खेळलै आहेत.

21) वकास व सरफराझ खान (हाँग काँग)

टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू हाँगकाँगचा वकास खान (15 वर्ष 259 दिवस) आणि सरफराझ खान हेसुध्दा जुळे बंधू आहेत. 19 वर्षाआतील संघात हे भावंड एकत्र खेळले.

22) लिझेल व व्हर्नन नेगेल (आस्ट्रेलिया )

गाजलेल्या बॉडीलाईन मालिकेत आस्ट्रेलिया साठी एक कसोटी सामना खेळलेला लिझल नेगेलचा जुळा भाऊ व्हर्नन हासुध्दा व्हिक्टोरियासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. पण लिझलला एकच कसोटी सामना खेळायला मिळाला तर व्हर्नन प्रथम श्रेणीपुरताच मर्यादीत राहिला.