गणपतीपुळ्यात बारा पर्यटकांना बुडताना वाचवले

रत्नागिरी/प्रतिनिधी :- गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या १२ पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले. हे पर्यटक बदलापूर, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक तसेच रत्नागिरीच्या नाचणे भागातील रहिवासी आहेत. शुक्रवारी दिवसभरात विशेषत: दुपारनंतरच्या सत्रात पर्यटक बुडत असल्याच्या एकूण तीन घटना घडल्या. त्यांना स्थानिक व्यावसायिक तसेच जीवरक्षकांनी वाचवले.

पहिल्या दुर्घटनेत नाचणे येथील मारिया अकिल फकीर (१२), सिमरन अकिल फकीर (१६), मुबारक रफिक शेख (२०), रत्नदीप हरिहर शहा (२४ सर्व रा. नाचणे-रत्नागिरी) यांना वाचवण्यात आले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला.

ही बातमी पण वाचा : चिपळुणातील चोऱ्यांप्रकरणी चौघे ताब्यात; साडेतीन लाखांचा माल जप्त

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून आलेल्या एका ग्रुपमधील प्रणय दत्तात्रय भिसे (१८), दीपक तुकाराम हरडकर (७०), विनय रवींद्र भिसे (२७), भालेश गजानन भिसे (२७), विकास गजानन भिसे (२४, सर्व रा. बदलापूर-मुंबई) या पाचजणांना बुडत असताना वाचवण्यात आले.

हे दोन प्रकार घडल्यानंतर थोड्याच वेळात तिसऱ्यांदा असाच प्रकार घडला. औरंगाबाद येथील मनिष सुरेश सोनावणे (३१), नाशिक येथील महेश अशोक जाधव (३९) आणि हिंगोली येथील विशाल लक्ष्मण शिंदे (२१) या तिघांना स्थानिकांनी वाचवले.

ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, ओंकार गावणकर, मयुरेश देवरुखकर, अक्षय माने यांच्यासह मोमीन खान, चेतन बोरकर, प्रशांत बोरकर, नूरखान, निखिल सुर्वे, सुरज शिंदे, रविकांत केतकर, जयेश रेवाळे, संदेश शिंदे, पोलीस मेजर गावीत यांनी या सर्व पर्यटकांचे जीव वाचवले.