तुषार, श्रेयस आणि एग सँडवीचची पैज

Shreyas Gopal-Tushar Deshpande

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) बुधवारी राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) जो प्रभावी विजय मिळवला त्यात एक नवोदीत खेळाडू जो चमकला तो म्हणजे तुषार देशपांडे (Tushar Deshpande) . पहिल्याच सामन्यात 37 धावात दोन बळी अशी कामगिरी करताना त्याने जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्ससारख्या (Ben Stokes) फलंदाजाला बाद केले पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपल्या पहिल्याच सामन्यात शेवटचे षटक टाकायला मिळावे एवढा दिल्ली कॕपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर व संघव्यवस्थापनाचा त्याने विश्वास जिंकला.

या षटकात राॕयल्सला 22 धावांची गरज होती आणि सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता राखणारा राहुल तेवतीयासारखा फलंदाज स्ट्राईकला होता पण तुषारने या षटकात फक्त आठ धावा दिल्या आणि शेवटच्या चेंडूवर श्रेयस गोपालला बादसुध्दा केले.

2008 च्या पहिल्या आयपीएलमध्ये बाॕल बाॕय म्हणून कार्यकर्ता असणाऱ्या कल्याणच्या या मराठमोळ्या खेळाडूचे स्वप्न साकार झाले. शिवाजी पार्कवर श्रेयस अय्यरसोबत खेळल्याचा, सोबत सराव केल्याचा त्याला फायदा झाला. 25 वर्षांच्या या जलद गोलंदाजाला दिल्ली कॕपिटल्सने 20 लाख मोजून आपल्या संघात घेतले.

डेल स्टेनला आदर्श मानणाऱ्या या खेळाडूने 2016 च्या कूचबिहार स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यानेचार सामन्यातच 21 विकेट काढल्या होत्या. साहजिकच 2016-17 च्या मोसमात तो मुंबईच्या रणजी संघात होता आणि आता तर आयपीएलमध्ये प्रभावी पदार्पण करीत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दुर्देवाने त्याचे हे यश पाहण्यासाठी आज त्याची आई नाही, गेल्यावर्षीच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली.

मुंबईने दशकभरात विजय हजारे ट्राॕफी जिंकण्यात त्याचा मोलाचा हातभार होता. भारत अ संघातही तो खेळलाय. कल्याणहुन लोकलने 60 किलोमीटर प्रवास करत दादरच्या शिवाजी पार्कवर तो क्रिकेटपटू म्हणून घडलाय.

2008 मधील बाॕल बाॕय असल्याच्या आठवणीत तो सांगतो की आमचा पूर्ण 13 वर्षाआतील संघच तिथे होता.तिथे धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, ड्वेन ब्राव्हो, शाॕन पोलाॕक आणि सचिन तेंडूलकरसारख्या खेळाडूंना जवळून बघणे भारी अनुभव होता.आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो.

गेल्या वर्षी आपली आई कायमची सोडून गेल्याच्या दुःखात असतानाही तीनच दिवसात तो सैयद मुश्ताक अली ट्राॕफीच्या सामन्यांसाठी मुंबईच्या टी-20 संघात होता.

श्रेयस अय्यरसोबत तो बालपणापासूनच शिवाजी पार्कवर खेळत आलाय. श्रेयसबद्दल तो म्हणतो की, शिवाजी पार्क अॕकेडमीत आम्ही जेंव्हा सोबत होतो, तेंव्हा आमचे फारसे जमत नव्हते. अजुनही आमची काही घट्ट मैत्री नाही पण एकमेकांबद्दल आम्हाला खूप आदर आहे. अॕकेडमीत आमची पैज लागायची आणि जो कुणी हरेल त्याला एग सँडवीच व बोर्नव्हिटाची पार्टी द्यावी लागायची. बहुतेकदा मीच जिंकायचो कारण त्याला कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे मला माहित होते. बालपणी तुम्हाला डावपेच येत नसतात, फक्त समोरच्या फलंदाजाला कसे बाद करायचे याचाच ध्यास असतो. तोसुध्दा जिंकायचा पण मी बऱ्याचदा जिंकायचो असे तो सांगतो.आता त्याच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात त्याला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचे सोने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER