साहेबराव मिसिंग यू सो मच

आपण नेहमी ऐकतो, वाचतो, बघतो की एखादी मालिका जेव्हा संपते तेव्हा सगळेच कलाकार भावूक होतात, कारण मालिकेचा सेट हे त्यांचं दुसरं घरच होऊन जातं. जवळपास अठरा-अठरा तास ते एकत्र असतात, त्यामुळे त्या वातावरणाची त्यांना खूप सवय झालेली असते. मालिकेतलं कुटुंब हे जरी ऑनस्क्रिन आपल्याला दिसत असलं तरी सगळे कलाकार एकरूप झालेले अस तात. जेव्हा एखादी मालिका संपते तेव्हा सगळेच कलाकार दुःखी होतात. आता आपण रोज भेटणार नाही, रोजची मजा मस्ती धमाल आपल्याला करता येणार नाही. हे बॉण्डिंग जसं कलाकारांमध्ये असतं तसंच मालिकेमध्ये जे काही प्राणी असतात त्या प्राण्यांचेदेखील एक नातं निर्माण झालेले असते आणि म्हणूनच मालिका ऑफ एअर गेल्यानंतर कलाकारांना ज्या प्राण्यांसोबत या मालिकेत काम केलं त्यांची आठवण येते. सध्या याच इमोशनल टप्प्यातून अभिनेता हार्दिक जोशी हादेखील जात आहे. तुझ्यात जीव रंगला (tujhyat jeev rangala) या मालिकेत साहेबराव म्हणजेच राणादाचा आवडता बैल ही भूमिका होती. राणादा आणि साहेबराव यांच्यातील अनेक सीन प्रेक्षकांना आजही आठवतात. काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपली आणि हार्दिक जोशी त्याच्या मुंबईच्या घरी गेला. पण जितकी हार्दिकला त्याच्या या मालिकेतील सगळ्या सहकारी कलाकारांची आठवण येत होती तितकीच साहेबराव बैलाची आठवण येत होती. जेव्हा काही दिवसानंतर तो कामानिमित्ताने कोल्हापुरात आला तेव्हा आवर्जून त्याने साहेबरावच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याच्या बरोबर गप्पा मारल्या. बर हे सगळं हार्दिकच्या बाबतीतच होत नव्हतं तर जेव्हा हार्दिक आणि साहेबरावची भेट झाली तेव्हा साहेबराव बैलही हार्दिकशी इतकी लगट करत होता की साहेबरावच्या खऱ्या मालकालाही हे दृश्य बघून खूप आनंद झाला.

जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका काही दिवसांपूर्वी संपली. मध्यंतरी या मालिकेत अनेक उपकथानकं जोडली आणि ही मालिका भरकटत असल्याच्या टीका होत होत्या. पण तरीही या मालिकेवर प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग होता. गावाकडच्या रांगड्या वातावरणामध्ये एक पैलवान आणि एक शिक्षिका यांचं फुललेले प्रेम या मालिकेत दाखवण्यात आलं होतं. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडली. हार्दिक जोशीने या मालिकेत पैलवान रणविजय गायकवाड यांची भूमिका केली होती. शेतकरी असलेला राणादाचा साहेबराव नावाचा एक निष्ठावंत बैल मालिकेत होता आणि हा बैल कोल्हापुरातल्या शेतकऱ्याचाच बैल होता. या मालिकेच्या निमित्ताने हार्दिक आणि साहेबराव यांची खूप गट्टी जमली होती. मालिका संपल्यानंतर सगळे कलाकार आपापल्या घरी गेले तसा साहेबराव देखील त्याच्या मालकाच्या घरी गेला पण राहून राहून हार्दिकला साहेबराव ची खुप आठवण येत होती. चित्रीकरणादरम्यानचा साहेबरावसोबतचा फोटोही हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया पेज वर शेअर केला होता. अजूनही तुझ्यात जीव रंगला अशी कॅप्शन देत साहेबराव विषयीच्या भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या. दरम्यान जेव्हा हार्दिक एका कामासाठी कोल्हापुरात आला तेव्हा त्याला साहेबरावची भेट घेतल्याशिवाय राहवलं नाही आणि या भेटीचाही फोटो त्याने सोशल मीडिया पेज वर शेअर केला.

हार्दिक सांगतो की मालिकेत काम करत असताना सगळ्याच कलाकारांची छान केमिस्ट्री जुळत असते. तुझ्यात जीव रंगला ही मालिका जवळपास तीन ते साडेतीन वर्ष टिव्हीवर सुरू होती. त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांचे एक कुटुंब तयार झालं होतं. आमच्या या मालिकेच्या कुटुंबामध्ये साहेबराव ही भूमिका करणारा बैल होता. आमच्या या मालिकेचं चित्रीकरण सुरुवातीच्या टप्प्यात वसगडे येथे सुरू होतं आणि नंतर ते केर्लीमध्ये सुरू झालं . साहेबराव कोल्हापुरातल्या शेतकरी कुटुंबातला बैल आहे. या निमित्ताने जेव्हा जेव्हा बैलासोबत माझे सीन असायचे तेव्हा साहेबराव त्याच्या मालकासोबत सेटवर यायचा. अर्थातच एखाद्या प्राण्यासोबत सीन करायचे म्हटल्यानंतर थोडीफार गट्टी जमली पाहिजे म्हणून मी साहेबराव सोबत गप्पा मारायचो. सुरुवातीला साहेबरावशी गप्पा सीन चांगला व्हावा म्हणून असायच्या पण या गप्पांमधूनच मी साहेबराव या बैला सोबत इतका कनेक्ट होत गेलो की कधीकधी सीन नसतानाही मी त्याच्या मालकाला फोन करून त्याला सेटवर घेऊन यायची विनंती करायचो आणि जेव्हा जेव्हा मला रिकामा वेळ असायचा तेव्हा मी त्याच्या बरोबर मजा मस्ती करायचो. शूटिंग सुरू असताना मला याची जाणीव झाली नाही पण जेव्हा ही मालिका संपली आणि आम्ही मुंबईला गेलो तेव्हा मला साहेबरावची खुप आठवण यायला लागली. मला त्याच्या सोबत केलेले सीन आठवायला लागले. सेटवर त्याच्याबरोबर केलेली मजा मस्ती मला सतत डोळ्यासमोर दिसायला लागली. त्या वेळेला इतकच माझ्या हातात होतं की मी त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आमच्या दोघांचं नातं काय होतं हे आमच्या प्रेक्षकाना सांगू शकत होतो. पण जेव्हा मी कामाच्या निमित्ताने कोल्हापूरला आलो तेव्हा मात्र मी त्याची भेट घेतल्याशिवाय परत जायचं नाही हे ठरवलं होतं. त्या भेटीमध्येही तो मला विसरला नव्हता हे मला लक्षात आलं. प्राण्यांना जीव लावला तर ते किती निरागसपणे आणि निस्वार्थपणे माणसाबरोबर एकरूप होतात हे मला साहेबरावने शिकवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER