सीसीपासने माँटे कार्लोत केली आपल्या आईच्या यशाची पुनरावृत्ती

Maharashtra Today

‘बाप तसा बेटा’ असे म्हणतात पण व्यावसायिक टेनिसमधील (Tennis) ग्रीसचा (Greece) आघाडीचा टेनिसपटू स्टेफानोस सीसीपास (Stefanos Tsitsipas) याच्याबाबत ही म्हण ‘आई तसा मुलगा’ अशी अधिक योग्य ठरते कारण 1981 मध्ये त्याच्या आईने जी स्पर्धा जिंकली होती (माँटे कार्लो)(Monte Carlo) तीच स्पर्धा त्याने रविवारी आंद्रे रुबलेव्हला नमवून जिंकली. याप्रकारे एकाच स्पर्धेत 40 वर्षाच्या अंतरात आईनंतर मुलगा विजेता ठरला आहे. ज्युलिया अपोस्टोली- साल्नीकोव्हा(Julia Apostoli- Salnikova) हे स्टेफानोसच्या आईचे नाव. त्या 1981 मध्ये माँटे कार्लो स्पर्धेच्या ज्युनियर गटात विजेत्या होत्या.

स्टेफानोस सीसीपासला वारसाच खेळांचा लाभला आहे. त्याचे आजोबा (आईचे वडील) सर्जी साल्नीकोव्ह हे 1956 च्या आॕलिम्पिकमधील फूटबॉल सुवर्णपदक विजेते होते तर त्याचे वडील अपोस्टोलस सीसीपास हे टेनिस प्रशिक्षक आहेत.

आपल्या आईप्रमाणेच माँटे कार्लोच्या विजेत्यांच्या यादीत नाव कोरल्याबद्दल सीसीपास म्हणाला की, हे अविश्वसनीय आहे. मी पहिल्यांदा आईसोबत जेंव्हा माँटे कार्लो कंट्री क्लबमध्ये गेलो होतो तेंव्हा मी जवळपास सहा वर्षांचा होता. त्यावेळी तिने मला विजेत्यांच्या यादीत तिचे नाव दाखवले होते. मी ते पाहिले तेंव्हा दंगच झालो होतो. वाॕव..फारच छान! अशी माझी भावना होती. पण पुढे जाऊन आपण त्याच स्पर्धेत विजेते ठरू असा त्याने विचारही केला नव्हता. पण गेल्या आठवड्यात ते घडून आले. डॕनिएल इव्हान्स व आंद्रे रुबलेव्ह यांना सरळ सेटमध्ये मात देत फक्त चारच गेम गमावून तो माँटे कार्लो ओपनचा विजेता ठरला.

सुरुवातीला मी याचा विचारही केला नव्हता पण उपांत्य फेरीत पोहोचल्यावर आईसोबत आपलेही नाव विजेत्यांच्या फलकावर लागू शकते हा विचार पहिल्यांदा माझ्या मनात आला. हे विजेतेपद मी दोन व्यक्तींना समर्पित करतो. एक म्हणजे माझे ग्रीसमधील प्रशिक्षक आणि दुसरे म्हणजे माझी आई कारण तिनेच मला हे स्वप्न दाखवले होते.

मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेचे हे सीसीपासचे पहिलेच विजेतेपद होते. एकही सेट न गमावता मास्टर्स 1000 चे पहिले विजेतेपद पटकावणारा तो नोव्हाक जोकोवीच व ग्रिगोर दिमित्रोव्ह नंतरचा पहिलाच खेळाडू ठरला.

आपल्या यशाची एक वेगळी बाजू सांगताना तो म्हणाला की, गेल्या काही महिन्यात माझ्या मानसोपचार तज्ज्ज्ञाच्या मदतीने मी श्वास घेण्याचे तंत्र बदलले आहे. आपण श्वासोच्छवास कसा करतो ते महत्त्वाचे आहे. विशेषतः काही काम करताना किंवा खेळताना.. या बदललेल्या तंत्राने मला स्वतःवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येत आहे.

सीसीपासच्या आई ज्युलिया ह्या रशियन टेनिसपटू आहेत. त्या सोव्हिएत रशियासाठी आणि 1990 नंतर ग्रीससाठी खेळल्या आहेत. त्या एकेरीच्या क्रमवारीत 194 तर दुहेरीच्या क्रमवारीत 130 व्या स्थानापर्यत पोहोचल्या होत्या. त्यांनी 1984 च्या मैत्री सामन्यांमध्ये रशियासाठी एक सुवर्ण व एक कास्यपदक जिंकलै होते. ग्रीक प्रशिक्षक आणि स्टेफानौसचे वडील आपोस्टोली यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर त्या दोन-तीन वर्ष ग्रीससाठीसुध्दा खेळल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button