युनूस खान म्हणतो, ‘खरे बोललो म्हणून कर्णधारपद गमवावे लागले’

Younis Khan

पाकिस्तानचा सर्वात यशस्वी फलंदाज आणि इम्रान खान नंतरचा एकमेव विश्वविजेता कर्णधार युनूस खान याने अलीकडेच आपल्या मनातले बोलताना सांगितले की, खरे बोललो म्हणून विश्वचषक जिंकून दिल्यावरही सहा महिन्यांतच त्याला कर्णधारपद गमवावे लागले. या 42 वर्षीय खेळाडूने आखातातील एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या भावना व्यक्त केल्या आहेत.

आठवत असेल तर पाकिस्तानी संघाने 2009 चा टी-20 विश्वचषक त्याच्याच नेतृत्वात जिंकला होता. मात्र त्यानंतर सहा महिन्यातच पाकिस्तानी संघातील सहा ते सात खेळाडूंच्या बंडामुळे त्याला कर्णधारपदाहून पायउतार व्हावे लागले होते.

त्या अप्रिय घटना आठवताना तो म्हणतो की खरे बोलण्याची मला ती शिक्षा होती. आयुष्यात अशी वेळ बऱ्याचदा येते की, खरे बोलण्यासाठी लोक तुम्हाला वेडा ठरवतात. माझी चूक एवढीच होती की देशासाठी वा संघासाठी सर्वस्व न देता हातचे राखून खेळणाऱ्या खेळाडूंकडे मी बोट दाखवले होते. पुढे जाऊन त्या खेळाडूंना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि आम्ही सर्व पुन्हा सहकारी बनून बराच काळ खेळलो. मला ठाऊक होते की मी काहीच चुकीचे केलेले नाही कारण माझ्या वडिलांनी मला नेहमीच खरे बोलण्याची आणि नम्र राहण्याची शिकवण दिली आहे.

पाकिस्तानच्या वारंवार कोलमडत्या फलंदाजीबद्दल तो म्हणतो की आमच्या फलंदाजांसमोर बघायला आदर्शच नाहीत. भारताचे उदाहरण घ्याल तर त्यांच्याकडे विराट व रोहित तयार होत होते तेंव्हा त्यांच्यासमोर सचिन तेंडूलकरसारखा फलंदाज होता ज्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. चांगले फलंदाज डावाची तयारी कशी करतात हे बघतानाच खूप काही शिकायला मिळते.

2017 मध्ये निवृत्त झालेला हा फलंदाज म्हणतो की, सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांचे काम खूप कठीण झाले आहे. प्रतिस्पर्धी संघ सातत्याने विरोधी संघातील सफल फलंदाजांचे व्हिडिओ बघून अभ्यास करत असतात. तो फलंदाज कुठे चुकतोय याचा ते सातत्याने शोध घेत असतात. तरीसुध्दा हे फलंदाज (विराट, रोहीत, स्टिव्ह स्मिथ) यशस्वी ठरताहेत ही कौतुकाची बाब आहे. उच्चस्तरावर कामगिरीत सातत्य राखणे फारच अवघड असते. त्यादृष्टीने तुम्हाला खंबीर बनवण्यासाठी मी पाकिस्तानी फलंदाजांसाठी एक व्हर्च्युअल कार्यशाळा घेतली होती. त्याचा आपल्याला फायदा झाल्याचे बाबर आझम सांगतो याचे मला समाधान आहे.

वन डे सामन्यांमध्ये आजच्यासारखे दोन्ही बाजूंनी नवे चेंडू आणि पॉवर प्ले व क्षेत्ररक्षणाची बंधने असती तर आम्ही आणखी किमान चार एक हजार धावा अधिक जमवल्या असत्या या सौरव गांगुली व सचिन तेंडूलकरच्या संदर्भाने बोलताना तो म्हणाला की, आपणसुध्दा वन डे सामन्यांमध्ये 10 हजार धावा केल्या असत्या. त्याच्या नावावर वन डे सामन्यांमध्ये 7249 धावा आहेत. तो म्हणाला की जर आम्ही हे करू शकलो असतो तर विचार करा विव्ह रिचर्डस् सारख्या खेळाडूंनी किती धावा केल्या असत्या?

पाकिस्तानच्या क्रिकेट आयोजनाबद्दल त्याने म्हटलेय की, क्रिकेटपटूंना चिंतामुक्त वातावरणात खेळता आले पाहिजे. त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी तुम्ही सदा न् कदा हॉटेलातील खोल्यांमध्ये कोंडून ठेऊ शकत नाही. पाकिस्तानी संघाने कसोटी सामने मायदेशी खेळावेत आणि मर्यादित षटकांचे सामने अमिरातीत खेळावेत, तसे झाल्यास पाकिस्तानी उदयोन्मुख खेळाडूंना देशातील कसोटी सामने बघून खेळाचे बारकावे शिकता येतील असे त्याने सुचवले आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या क्रिकेटबद्दल तो म्हणाला की, आपण अजुनही या मालिकांच्या प्रेमात आहोत. या दोन देशांतील सामने हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात समृध्द करणारा अनुभव आहे. 2005 ला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आम्ही बसमधून उतरलो त्यावेळचा जल्लोष आणि स्वागत मी कधीही विसरू शकत नाही.

युनूसखानने 118 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी 52 च्या सरासरीने 34 शतकांसह 10099 धावा केल्या आहेत. वन डे सामन्यांमध्ये त्याने 31 च्या सरासरीने 7 शतकांसह 7249 तर 25 टी-20 सामन्यांमध्ये 442 धावा केल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER