धनंजय मुंडेंचा सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे : तृप्ती देसाई

Trupti Desai - Dhananjay Munde

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पहिल्यांदाच समोर येत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का? त्यांचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

तृप्ती देसाई या बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत काही लोक करताना दिसत आहेत. धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा असल्याप्रमाणे त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती. त्यानंतर रेणू शर्मा यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा करुणा शर्मा यांनी जर असा तक्रारी अर्ज दिला असेल तर धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासायला हवी. हे असेच सुरु राहिले तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेल्या नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, अशी भीती तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षविस्तारासाठी लवकरच परिवार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा विदर्भातून सुरु झाली आहे. हाच धागा पकडत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का, हे पण तपासले पाहिजे. त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER