
अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना ८ ते ११ डिसेंबर शिर्डीत प्रवेश करण्यास पोलीसांनी बंदीची नोटीस बजावली आहे. ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावे,’ या फलकावर आक्षेप घेऊन, तो काढण्यासाठी त्या शिर्डीत येणार होत्या.
साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येताना फक्त भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे कपडे घालू नये, असे आवाहन साई संस्थानने केले आहे. तसा फलक साई मंदिराच्या आवारात लावण्यात आले आहेत. संस्थानच्या या आवाहनानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील तो फलक हटवण्याची मागणी केली. फलक हटवला नाही; तर स्वत: जाऊन तो काढणार, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यांनतर तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदीची नोटीस शिर्डी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
साई संस्थानचे भक्तांना आवाहन
साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावे,’ असे आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आले आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे लक्षात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावे, असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे म्हणालेत.
साई मंदिरातील तो फलक काढून टाकण्याचे आवाहन देसाई यांनी केलेले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न असतात. अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असे त्या म्हणाल्या. साई संस्थानने तो फलक काढला नाही; तर आम्हाला येऊन तो काढावा लागेल, असा ईशाराही देसाई यांनी साई संस्थानला दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला