ट्रम्प यांच्या भारतीय उच्चारावरुन हास्यकल्लोळ

सोशल मीडियावर मेम्स व कॉमेंटसचा पूर

Donald Trump-Cricket

अहमदाबाद :अमेरिकेचे राष्टअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात त्याच्या विशिष्ट अमेरिकन शैलीत केलेल्या भारतीय उच्चारांनी हास्यकल्लोळ उडाला असून सोशल मीडियावर मेम्स व कॉमेंटसचा पूर आला आहे. विशेषत: कोट्यवधी क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावाच्या उच्चाराने सोशल मीडियाला बिझी ठेवले आहे. व्हिडीओ व ऑनलाईन गेमिंगमध्ये क्रिकेटचा लोकप्रिय गेम असलेल्या ‘इ.ए.क्रिकेट’ मधून तर ट्रम्प यांनी ही नावे उचलली नाहीत ना, अशी टिप्पणी होत आहे.

ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकरचा उच्चार सू..चिन तेंडूलकर असा आणि विराट कोहलीचा उच्चार विराट को..ली असा केला. त्यांच्या या उच्चारांना मोटेरा स्टेडियममध्ये उपस्थित लक्षावधी लोकांनी मनमोकळे हसून दाद दिली. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहासुद्धा होते.

हिंदी सिनेसृष्टीबद्ल ते म्हणाले की, भारत हा कल्पकतेची खाण असलेला देश आहे म्हणून येथे बॉलीवूडमध्ये वर्षाकाठी दोन हजारांवर सिनेमे बनतात. भूतलावर सर्वत्र लोक या बॉलिवूड फिल्म्स, भांगडा आणि डीडीएलजे व शोले (शो..जे) सारखे ग्रेट सिनेमा बघून आनंद घेतात. महान क्रिकेटपटू सचिन (सू..चिन तेंडुलकर) आणि विराट कोहली (को..ली) यांचा तुम्ही घोष करता.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी चायवालाचाही उल्लेख चीवाला, शोलेचा उल्लेख शोजे, वेदांचा उल्लेख वेस्टाज, स्वामी विवेकानंदांचा उल्लेख स्वामी विवेकमानन असा केला.